कारवाई न झाल्यास पंचायत समितीत शाळा भरवण्याचा इशारा!
मानोरा (Karli Zilla Parishad Teacher) : पंचायत समिती मानोरा अंतर्गत येणाऱ्या मौजे कार्ली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत शिक्षक आर. एस. भोरकडे हे मागील अंदाजे ५ वर्षांपासून अर्धांगवायूने आजारी असल्यामुळे वारंवार सुट्टीवर जात असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या प्रकरणी शाळा व्यवस्थापन समितीने गटशिक्षणाधिकारी अनिल पवार यांच्याकडे दि. ८ जून रोजी निवेदन देऊन नवीन शिक्षकाची प्रतिनियुक्ती देण्याची मागणी केली आहे.
जि.प.प्राथ. शाळा कार्ली (Karli Zilla Parishad Teacher) येथे वर्ग १ ते ७ पर्यंत असून पटसंख्या १५० ते १५५ आहे. शिक्षकांची संख्या ६ असून त्यापैकी १ शिक्षक आर. एस. भोरकडे हे दीर्घ आजारामुळे शाळेत नियमित येऊ शकत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यासंदर्भात केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक यांनी दिनांक ५ जुलै २०२५ रोजी कारणे दाखवा नोटीस दिली होती. तसेच शा.व्य.स. सभेत दिनांक २६ मे २०२५ रोजी ठराव क्रमांक ४ अन्वये चर्चा करण्यात आली होती. त्यानंतर शिक्षणाधिकारी, वाशिम यांच्याकडे सुध्दा दिनांक २२ डिसेंबर २०२५ रोजी तक्रार करण्यात आली होती.
परंतु अद्यापपर्यंत योग्य ती कार्यवाही झाली नाही, यामुळे ते (Karli Zilla Parishad Teacher) शिक्षक अद्याप शाळेत कार्यरत आहेत. नवीन शैक्षणिक सत्राच्या सुरुवातीलाच अतिरिक्त शिक्षकांमधून शाळेत दुसरा शिक्षक देण्यात यावा व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे, अन्यथा पंचायत समिती मानोरा येथे विद्यार्थ्यांची शाळा भरवण्यात येईल. याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन राहील, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. निवेदनावर शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा रुपाली देवकर, उपाध्यक्ष साहेबराव भारस्कर, सदस्य मयुरी राऊत, पापेश्वर डहाके, पुष्पा पांडे, गजानन देवकर, निखिल दुमारे, युवराज होळगरे व सचिव कृष्णराव सोळंके आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.