अमरसिंग नाईक तांडा जि.प. शाळेप्रकरणी ग्रामस्थांचे निवेदन; चौकशीची मागणी
सेनगाव (Tanda Zilha Parishad School ) : तालुक्यातील अमरसिंग नाईक (तांडा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील कार्यपद्धतीबाबत ग्रामस्थांनी गंभीर तक्रारी केल्या आहेत. शाळेत शिक्षक नियमित उपस्थित राहत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप करत संबंधित शिक्षकाची चौकशी करून दोष आढळल्यास नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनानुसार, शाळेच्या नोंदीनुसार विद्यार्थ्यांची संख्या सुमारे दहा असून प्रत्यक्ष नियमित उपस्थिती दोन ते तीन विद्यार्थ्यांपर्यंत असल्याचा दावा करण्यात आला आहे. या शाळेत बाबुलाल सकलाल चव्हाण हे शिक्षक कार्यरत असून ते नियमित पूर्णवेळ शाळेत उपस्थित राहत नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. सकाळी अल्पकाळ शाळेत उपस्थित राहिल्यानंतर शाळा बंद राहत असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
संबंधित शिक्षकाकडून शासकीय सेवेत असतानाच विविध प्रकारची कंत्राटी कामे केली जात असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे. त्यांच्या नातेवाईकांच्या नावावर विविध शासकीय विभागांमार्फत कामे घेतली जात असून, त्या कामांच्या दर्जाबाबतही चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तसेच, हत्ता परिसरात 'बी.एस. चव्हाण' या नावाने बिअर बार व्यवसायाशी संबंधित असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. शेतकर्यांच्या जमिनी कमी दरात खरेदी करून पुढे विक्री करण्यासह ग्रामपंचायतीच्या कामकाजात हस्तक्षेप व राजकीय सक्रियतेचेही आरोप करण्यात आले आहेत. शासकीय शिक्षकाने आपल्या मूळ कर्तव्याच्या वेळेत नियमितपणे शाळेत उपस्थित राहणे अपेक्षित असताना, त्यांच्यावर करण्यात आलेले हे आरोप गंभीर स्वरूपाचे असल्याने प्रशासनाने निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी रतनलाल मोहनलाल भट्टड, महादू गोरे, उत्तम ठोके, शेख हकीम यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.
दरम्यान, या निवेदनातील आरोपांची स्वतंत्र प्रशासकीय चौकशी होऊन वस्तुस्थिती स्पष्ट झाल्यानंतरच पुढील कारवाई होणे अपेक्षित आहे. संबंधित शिक्षकांची बाजू तसेच शिक्षण विभागाचे अधिकृत म्हणणे समोर आल्यानंतरच प्रकरणाचे संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताच्या दृष्टीने प्रशासन या तक्रारीची कितपत दखल घेते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.