शक्तीपीठ महामार्ग आंदोलन

शक्तीपीठ महामार्ग: पालकमंत्र्यांना जाब विचारण्यासाठी आलेल्या शेतकर्‍यांसोबत पोलिसांची झटापट 

Shaktipeeth Expressway Protest: शासनाने प्रस्तावित केलेला शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा या मागणीसाठी संतप्त शेतकरी गुरूवारी हिंगोलीत दाखल झाले होते. ध्वजारोहनासाठी येणार्‍या पालकमंत्र्यांना जाब...

शक्तीपीठ महामार्ग: पालकमंत्र्यांना जाब विचारण्यासाठी आलेल्या शेतकर्‍यांसोबत पोलिसांची झटापट 

Shaktipeeth Expressway Protest

हिंगोली (Shaktipeeth Expressway Protest) : शासनाने प्रस्तावित केलेला शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा या मागणीसाठी संतप्त शेतकरी गुरूवारी हिंगोलीत दाखल झाले होते. ध्वजारोहनासाठी येणार्‍या पालकमंत्र्यांना जाब विचारण्याकरीता त्यांनी महाराजा अग्रसेन चौकात ठिय्या मांडला होता. परंतु पालकमंत्र्यांनी आंदोलनकर्त्यांकडे पाठ फिरविल्याने शेतकरी संतप्त झाले असता पोलिसांसोबत झटापट झाली.

हिंगोली जिल्ह्यातून शक्तीपीठ महामार्ग जात असुन जिल्ह्यातील जवळपास २० गावातील जमिन संपादीत करण्याची प्रक्रीया शासन स्तरावरून सुरू आहे. त्यासाठी शेतकर्‍यांना नोटीसही बजावण्यात आल्या आहेत.  परंतु एक इंचही जमिन देणार नाही, असा निर्धार शेतकर्‍यांनी करून महामार्गाला तीव्र विरोध दर्शविला आहे. याच निमित्ताने अनेक वेळा बाधित गावातील शेतकर्‍यांनी मोजणीस आलेल्या अधिकारी व कर्मचार्‍यांना घटनास्थळावरून परतवून लावले. मध्यंतरी १५ ऑगस्टला पालकमंत्री नरहरी झिरवाळ हे आले होते. त्यांच्या उपस्थितीत डीपीडीसी सभागृहात बैठक सुरू असताना शक्तीपीठ महामार्ग विरोधी समितीने सभागृहात शिरकाव करून पालकमंत्र्यांवर प्रश्नांचा भडीमार केला होता. त्यावेळेसही पालकमंत्री झिरवाळ यांना बैठकीतून काढता पाय घ्यावा लागला होता. 

१७ सप्टेंबरला मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त पालकमंत्री नरहरी झिरवाळ हे हिंगोलीत आले होते. सकाळी स्मृतिस्तंभास आदरांजली अर्पण करण्यास व ध्वजारोहना करीता पालकमंत्री झिरवाळ हे येणार असल्याने शक्तीपीठ विरोधी समितीचे पुरूष व महिला शेतकरी सकाळीच हिंगोलीत दाखल झाले होते. याबाबतची माहिती पोलिसांना मिळाल्याने अग्रसेन चौकामध्ये बॅरेकेटींग लावून त्यांना अडवण्यात आले होते. पालकमंत्री झिरवाळ यांनी शेतकर्‍यांसोबत चर्चा करावी असा सुर त्यांचा होता. परंतु शेतकर्‍यांसोबत चर्चा न करता त्यांचा ताफा दुसर्‍या मार्गावरून जात असताना शेतकरी संतप्त झाले.

याचवेळी पोलिसांनी लावलेली बॅरेकेटींग झुगारण्याचा प्रयत्न शेतकर्‍यांनी केला असता उपस्थित पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांसोबत शेतकर्‍यांची झटापट झाली. शेवटी तहसिलदार श्रीकांत भुजबळ यांनी आंदोलनस्थळी येऊन शेतकर्‍यांशी चर्चा केल्यानंतर त्यांच्या मागण्या व भावना प्रशासनामार्फत पोहचविण्याचे आश्वासन दिल्याने शेतकर्‍यांनी आंदोलन मागे घेतले. परंतु शेतकर्‍यांचा संताप पाहून काहीवेळ पोलिसांनाही घाम फुटला होता. कोणतीही अनूचित घटना घडू नये, या दृष्टीने पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात केला होता.