सेनगाव पोलिसांनी चौघांना केली अटक
सेनगाव (Police Officer Assault) : शासकीय कर्तव्य बजावत असलेल्या पोलिस कर्मचार्याला मारहाण करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी सेनगाव पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, चारही आरोपींना अटक केली आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दि. १२ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास गणेशपूर ते हट्टा मार्गावर पोलिस कर्मचारी पिकअप वाहन क्र. एमएच-२२ एएन-२२९१ वर चलानाची कारवाई करीत होते. त्यावेळी आरोपींनी संगनमत करून पोलिसांच्या शासकीय कामात अडथळा निर्माण केला.
तसेच फिर्यादी पोलीस कर्मचारी जीवन आनंदराव मस्के यांना थापड-बुक्क्यांनी व दगडाने मारहाण करून जखमी केले. यानंतर त्यांना जीवे मारण्याची धमकी देत शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी गजानन वामन चव्हाण, सुदाम वसराम चव्हाण, राजेश सुभाष चव्हाण आणि वामन भुरा चव्हाण सर्व रा. गणेशनगर तांडा, ता. जिंतूर, यांच्याविरुद्ध सेनगाव पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील गजानन वामन चव्हाण, सुदाम वसराम चव्हाण, राजेश सुभाष चव्हाण आणि वामन भुरा चव्हाण या चारही आरोपींना सेनगाव पोलिसांनी अटक केली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आर. व्ही. खंदारे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.