पातूर (Construction Workers Children Scholarship) : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाअंतर्गत नोंदणीकृत कामगारांच्या पाल्यांसाठी असलेली शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना गेल्या काही काळापासून बंद तसेच प्रलंबित ठेवण्यात आली आहे. ही योजना त्वरित पूर्ववत सुरू करण्यात यावी, या मागणीसाठी कामगार प्रतिनिधी रितेश मनोहर फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली बांधकाम कामगार यांनी पातूरचे तहसीलदार राहुल वानखेडे यांच्यामार्फत सहाय्यक कामगार आयुक्त, अकोला यांना निवेदन सादर केले आहे.
पातूर तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागात गोरगरीब आणि रोजंदारीवर काम करणारे शेकडो नोंदणीकृत बांधकाम कामगार वास्तव्यास आहेत. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून हे कामगार आपल्या मुलांना उच्च व दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु, प्रशासनाकडून ही शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक लाभांचे वितरण ठप्प झाल्यामुळे अनेक कामगारांच्या मुलांच्या शिक्षणावर टांगती तलवार निर्माण झाली असून, शैक्षणिक शुल्क भरताना पालकांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे.
निवेदनातील प्रमुख मागण्या:
बांधकाम कामगारांच्या पाल्यांसाठी बंद करण्यात आलेली शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना तत्काळ पूर्ववत सुरू करण्यात यावी.
मागील प्रलंबित असलेले सर्व शिष्यवृत्तीचे अर्ज त्वरित मंजूर करून लाभाची रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात यावी.
शैक्षणिक शिष्यवृत्ती योजनेच्या प्रक्रियेत सुलभता आणून विद्यार्थ्यांना वेळेवर लाभ मिळण्यासाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभी करावी.
या (Construction Workers Children Scholarship) गंभीर बाबीची दखल घेऊन प्रशासनाने गोरगरीब कामगारांच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी बंद पडलेली शिष्यवृत्ती योजना त्वरित सुरू करावी, अशी नम्र विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या निवेदनावर तहसीलदार कार्यालयाकडून तात्काळ संबंधित विभागास हे निवेदन पाठवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या निवेदनाची प्रत कामगार मंत्री महाराष्ट्र राज्य आकाश दादा फुंडकर, मुख्य कार्यकारी अधिकारी (महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ, मुंबई) आणि अकोला जिल्हाधिकारी यांनाही माहिती व पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यात आली आहे.