संत कबीर बहुउद्देशीय आदिवासी विकास मंडळाच्या वतीने गुणवंतांचा गौरव
नागपूर (Sant Kabir Tribal Development Board) : संत कबीर बहुउद्देशीय आदिवासी विकास मंडळाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार समारंभ 27 सप्टेंबर 2026 रोजी जैन भवन, गांधीबाग नागपूर येथे उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाचे उद्घाटन नगरसेविका रेखा गिरधारी निमजे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगरपंचायत बिडगाव-पांढुर्णा-तरोडी खुर्दचे सभापती प्रीतम बोकडे, नगरसेवक शेषराव गोतमारे, अस्तित्व फाऊंडेशनचे प्रकाश हेडाऊ, सेवानिवृत्त जलसंधारण अधिकारी अवधेशजी देवांगण, सेवानिवृत्त बँक अधिकारी किशोर निमजे, समाजभूषण बाबुजी बांगडे तसेच संस्थेचे अध्यक्ष दलित निमजे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
या सोहळ्यात इयत्ता दहावीतील 54 आणि बारावीतील 21 गुणवंत व मेरिटधारक विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या तसेच संस्थेच्या कार्यकारिणीच्या हस्ते सत्कार करण्यात आला. इयत्ता दहावीमध्ये सौरस येथील कु. स्वरा रुपेश बोकडे हिने 95 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. तर नागपूर येथील कु. आयुषी प्रफुल्ल बारापात्रे हिने बारावीच्या परीक्षेत 98 टक्के गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले.

यावेळी प्रकाश हेडाऊ यांनी नियमित अभ्यास, सातत्य आणि मेहनतीच्या जोरावर नोकरीच्या काळात पीएच.डी.पर्यंतचे शिक्षण कसे पूर्ण केले, याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सामाजिक कार्यकर्ते गोपाल बांगडे यांनी अंधश्रद्धा निर्मूलन तसेच विविध औषधी वनस्पतींचे महत्त्व याबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी गजेंद्र गोखले, विनोद नंदनवार, सुनील गोखे, गिरधारी निमजे, देविदास ठोसर, हुशानंद निमजे, मनोज गोखे, सुरेश बारापात्रे, शरद हेडाऊ, नामदेव बांगडे, प्रभाकर ग. निखारे, ओमप्रकाश हेडाऊ, उर्मिला सुरेंद्र हेडाऊ, कमलेश पराते तसेच अस्तित्व फाऊंडेशन यांनी मोलाचे योगदान दिले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव रूपेश बारापात्रे यांनी केले, तर संचालन प्रीती गोखले यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संगीता सोनकुसरे, उषाताई निमजे, रमेश मधुकर पराते तसेच संस्थेच्या कार्यकारिणी सदस्यांनी सहकार्य केले.
