१५ ते २० विद्यार्थ्यांच्या वर्गात घडली दुर्घटना; माहूर तालुक्यातील ४४ वर्गखोल्या धोकादायक
माहूर (Sakur School Roof Collapses) : नांदेड तालुक्यातील मौजे साकूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ३० सप्टेंबरचा दिवस विद्यार्थ्यांसाठी धोक्याचा ठरला. दुपारी सुमारे १.४५ वाजता १५ ते २० विद्यार्थ्यांचे वर्ग अध्यापन सुरू असताना अचानक वर्गखोलीच्या छताचा मोठा गिलावा कोसळल्याने विद्यार्थ्यांमध्ये एकच आरडाओरड झाली. या दुर्घटनेत काही विद्यार्थी व विद्यार्थिनी किरकोळ जखमी झाल्याचे सांगण्यात येत असून, एका विद्यार्थ्याच्या पाठीला गंभीर दुखापत झाल्याची माहिती आहे. उपस्थित शिक्षकांनी प्रसंगावधान राखत विद्यार्थ्यांना तातडीने वर्गाबाहेर काढल्याने मोठी दुर्घटना टळली.
मध्यान्ह भोजनानंतर नियमित अध्यापन सुरू असतानाच अचानक छताचा गिलावा कोसळल्याने (Sakur School Roof Collapses) शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शाळेच्या इमारतीची अवस्था यापूर्वीच चिंताजनक असल्याचे पालकांचे म्हणणे असून, इमारतीच्या दुरुस्तीची मागणी स्थानिक ग्रामपंचायत तसेच संबंधित प्रशासनाकडे करण्यात आली होती. मात्र, त्याकडे वेळेत गांभीर्याने लक्ष न दिल्याने ही दुर्घटना घडल्याचा आरोप पालकांकडून होत आहे.
विशेष म्हणजे साकूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतचे वर्ग आहेत. येथील मुळ पदस्थापनेवरील शिक्षक श्री. लासुरे यांची केंद्रप्रमुख म्हणून पदोन्नती झाल्यानंतर शाळा शून्य शिक्षकी झाली होती. नव्याने शिक्षक उपलब्ध न झाल्याने शाळेला अद्यापही हक्काचा शिक्षक मिळालेला नाही. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून गटशिक्षणाधिकारी कार्यालयाच्या वतीने प्रतिनियुक्तीवर शिक्षक देऊन अध्यापन व शालेय व्यवस्थापन सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, आता शाळेच्या इमारतीच्या सुरक्षिततेचा प्रश्नही गंभीरपणे समोर आला आहे.
माहूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या (Sakur School Roof Collapses) तब्बल २८ प्राथमिक शाळांमधील ४४ वर्गखोल्या धोकादायक अवस्थेत असल्याची माहिती समोर आली आहे. अनेक शाळांच्या इमारतींना तडे गेले आहेत, काही ठिकाणी छत गळत आहे, भिंती कमकुवत झाल्या आहेत, तर काही इमारती पडझडीच्या उंबरठ्यावर असल्याचे सांगितले जाते. पावसाळ्यात या समस्येचे गांभीर्य आणखी वाढले असून, गळक्या छताखाली आणि ओलसर भिंतींच्या सावटाखाली विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावे लागत असल्याच्या तक्रारी आहेत.
धोकादायक वर्गखोल्या बंद करून पर्यायी व्यवस्था करण्याऐवजी काही ठिकाणी त्याच इमारतींमध्ये विद्यार्थ्यांचे वर्ग भरवले जात असल्याचा आरोप पालकांकडून होत आहे. काही शाळांची अवस्था अत्यंत बिकट असतानाही त्या अधिकृत धोकादायक यादीत नसल्याने शिक्षण विभागाच्या सर्वेक्षणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. नवीन इमारती किंवा दुरुस्तीबाबत प्रस्ताव सादर होऊनही प्रत्यक्ष कार्यवाहीला विलंब होत असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे.
साकूर येथील दुर्घटनेनंतर माहूर तालुक्यातील धोकादायक शाळा इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका निर्माण झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का? असा संतप्त सवाल पालकांकडून उपस्थित केला जात आहे. ग्रामीण भागातील अनेक पालक सुरक्षितता आणि शिक्षणाच्या गुणवत्तेच्या कारणास्तव जिल्हा परिषद शाळांऐवजी खासगी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे वळत असताना, सरकारी शाळांच्या इमारतींची अशी अवस्था राहिल्यास या शाळांवरील पालकांचा विश्वास आणखी कमी होण्याची भीती व्यक्त होत आहे.
एकीकडे अनेक जिल्हा परिषद शाळांमध्ये (Sakur School Roof Collapses) शिक्षकांची कमतरता असून द्विशिक्षकी शाळांमध्ये एकाच शिक्षकावर अनेक वर्गांची जबाबदारी येत आहे, तर दुसरीकडे जीर्ण व धोकादायक इमारतींमध्ये विद्यार्थ्यांना बसवले जात असल्याने शिक्षणाबरोबरच सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
साकूर येथील घटनेची गंभीर दखल घेत जिल्हा परिषद नांदेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तातडीने संबंधित शाळेच्या इमारतीची पाहणी करून स्ट्रक्चरल ऑडिट करावे, आवश्यक दुरुस्तीची कामे तातडीने हाती घ्यावीत आणि जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आर्थिक तरतूद करून विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शाळा व्यवस्थापन समिती, पालक आणि शिक्षणप्रेमी नागरिकांकडून होत आहे.