मुंबई-पुणे संपर्क विस्कळीत, मिसिंग लिंकच्या सुरक्षिततेवर उपस्थित केले प्रश्न; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिस्थितीवर स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणी
मुंबई : राज्यभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीवरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. मुंबई, पुणे, ठाणे, कोकण आणि इतर भागांतील जनजीवन विस्कळीत झाल्याचा उल्लेख करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने राज्यात 'आणीबाणी' जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली.
माध्यमांशी संवाद साधताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, महाराष्ट्रात यापूर्वीही अनेकदा मुसळधार पाऊस झाला आहे. मात्र, यावेळी निर्माण झालेली परिस्थिती अभूतपूर्व आणि अत्यंत चिंताजनक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने संपूर्ण राज्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन जनतेसमोर वस्तुस्थिती मांडावी, तसेच आवश्यक निर्णय घ्यावेत, असे त्यांनी सांगितले.
राज्यातील अतिवृष्टीमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे, जुना मुंबई-पुणे महामार्ग, मिसिंग लिंक प्रकल्प तसेच ताम्हिणी घाट या महत्त्वाच्या मार्गांवरील वाहतूक मोठ्या प्रमाणावर प्रभावित झाली आहे. याशिवाय आळंदी परिसरात पूरस्थिती निर्माण झाली असून रेल्वे वाहतूकही विस्कळीत झाली आहे. अनेक ठिकाणी दरडी कोसळल्याने दोन प्रमुख शहरांमधील संपर्क तुटल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा वेळी रुग्ण, डॉक्टर, विद्यार्थी आणि अत्यावश्यक सेवांसाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांचे मोठे हाल होत असल्याचे सुप्रिया सुळे यांनी नमूद केले.
नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या मिसिंग लिंक प्रकल्पाच्या गुणवत्तेबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. या प्रकल्पाचे मोठ्या उत्साहात उद्घाटन करण्यात आले होते. मात्र, पावसाळ्यात समोर येत असलेले व्हिडिओ चिंताजनक असल्याचे त्यांनी सांगितले. प्रकल्पावर मोठा निधी खर्च झाला असताना नियोजनात त्रुटी का राहिल्या, प्रकल्पाचे सुरक्षा परीक्षण (Safety Audit) झाले होते का आणि नैसर्गिक आपत्तींचा विचार करून त्याची रचना करण्यात आली होती का, याची उत्तरे सरकारने द्यावीत, अशी मागणी त्यांनी केली.
यासोबतच वसई-विरार, भांडूप आणि मुंबईतील विविध विकास प्रकल्पांमध्ये सुरक्षितता आणि पर्यावरणीय बाबींचा पुरेसा विचार झाला नसल्याचा आरोप करत त्यांनी या प्रकरणांची पारदर्शक चौकशी करण्याची मागणीही केली.
मुंबई-पुण्यासह अनेक भागात सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे शहरांमध्ये अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. वाहतूकीची कोंडी होत असून यामुळे नागरीकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. माझी शासनाला विनंती आहे की, पुण्यातील राजीव गांधी इन्फोटेक पार्कसह पावसाचा तडाखा बसलेल्या…
— Supriya Sule (@supriya_sule) July 6, 2026
सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, सरकारचे लक्ष विरोधकांवर कारवाई करण्यात आणि राजकारण करण्यात अधिक असल्याची भावना जनतेत निर्माण झाली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक नियोजन आणि प्रभावी आपत्ती व्यवस्थापनावर अधिक भर देण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराशी संबंधित चंदा चोरी आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांचाही त्यांनी उल्लेख केला. हा मुद्दा आगामी संसदेच्या अधिवेशनात INDIA आघाडी ठामपणे मांडणार असून, आघाडीच्या पुढील बैठकीत या विषयावर सविस्तर चर्चा केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.