पोहरादेवी एसटी आरक्षण उपोषण

पोहरादेवी येथील उपोषणकर्त्याला प्रशासनाने  सोडले वाऱ्यावर

Pohradevi ST Reservation: पोहरादेवी येथे एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या सात दिवसांपासून उपोषणाला बसलेले आर्णी येथील जयसिंग रामावत यांची प्रकृती अस्वास्थ्यामुळे खालावली होती.

पोहरादेवी येथील उपोषणकर्त्याला प्रशासनाने  सोडले वाऱ्यावर

Pohradevi ST Reservation

 

सामाजिक कार्यकर्त्यांच्या हस्तक्षेपानंतर प्रशासनाला जाग

मानोरा (Pohradevi ST Reservation) : पोहरादेवी येथे एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या सात दिवसांपासून उपोषणाला बसलेले आर्णी येथील जयसिंग रामावत यांची प्रकृती अस्वास्थ्यामुळे खालावली होती. प्रशासनाने त्यांना जबरदस्तीने उचलून मानोरा येथील ग्रामीण आरोग्य रुग्णालयात हलविले, मात्र त्यानंतर प्रशासनाने त्यांना अक्षरशः वाऱ्यावर सोडल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जयसिंग रामावत हे पोहरादेवी येथे उपोषणाला बसले होते. सातव्या दिवशी त्यांची प्रकृती बिघडल्याने प्रशासनाने त्यांना तातडीने मानोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांची कोणतीही वैद्यकीय तपासणी करण्यात आली नाही, तसेच त्यांच्या जवळ कोणीही उपस्थित नव्हते. एकप्रकारे त्यांना बेवारस अवस्थेत सोडून देण्यात आले होते.

अस्वस्थ असतानाही कोणतीही मदत मिळत नसल्याने अखेर त्यांच्या सहकाऱ्याने समाज बांधवांना व्यथा कळविली. तेंव्हा तात्काळ राष्ट्रीय बंजारा महासंघाचे जिल्हा अध्यक्ष तथा माजी मंडळ अधिकारी  अरुण राठोड, नीलकंठ  राठोड, अनिल चव्हाण यांनी प्रशासनाशी संपर्क साधून जाब विचारला. त्यांच्या प्रयत्नांमुळे अखेर प्रशासनाला जाग आली आणि तातडीने हालचाल करत जयसिंग रामावत यांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या, तसेच योग्य उपचार सुरू करण्यात आले.

प्रशासनाच्या या बेजबाबदार वृत्तीबद्दल बंजारा समाजातून तीव्र संताप व्यक्त होत असून, ऐनवेळी मदतीला समाज बांधव धावून आल्याबद्दल यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.