साई उमेश पेट्रोलपंपावरील थरारक घटना;
इंडियन ऑइल कंपनी लिमिटेडच्या नांदेड विभागाचे सेल्स ऑफिसर महेश शेळके यांचा मृत्यू
हिंगोली (Petrol pump murder case) : वसमत तालुक्यातील चोंडी स्टेशन येथील साई उमेश पेट्रोलपंपावर पेट्रोलपंप चालविण्यावरून झालेल्या वादाचा रक्तरंजित शेवट झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (६ ऑक्टोबर) दुपारी घडली. या घटनेत इंडियन ऑइल कंपनी लिमिटेडच्या नांदेड विभागाचे सेल्स ऑफिसर महेश अण्णाराव शेळके (वय ३७) यांच्यावर खंजीराने वार करण्यात आले. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी उमेश पांडवीर यांच्यासह पाच जणांविरुद्ध कुरुंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस नोंदीनुसार, ६ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ ते ४.१५ वाजण्याच्या सुमारास चोंडी स्टेशन येथील साई उमेश पेट्रोलपंपाच्या मोकळ्या जागेत ही घटना घडली. पेट्रोलपंप दुसर्याला चालविण्यास देण्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला. वाद वाढल्यानंतर आरोपींनी महेश शेळके यांच्याशी मारहाण केली. त्यानंतर उमेश साहेब पांडवीर याने खंजीराने महेश शेळके यांच्या पाठीवर, छातीवर, डोक्यावर, दंडावर, गळ्यावर, पोटावर तसेच शरीराच्या इतर भागांवर वार केल्याचे पोलिस तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या (Petrol pump murder case) हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शेळके यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी उमेश साहेब पांडवीर, साहेब पांडवीर यांची पत्नी तसेच अन्य तीन व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डी.आर.मध्ये अन्य संशयितांचे अंदाजे वय, कपडे व शारीरिक वर्णन नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार पोलिसांकडून संशयितांचा शोध घेतला जात आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलीस अधीक्षक डॉ. श्रेणिक लोढा, अपर पोलीस अधीक्षक कमलेश मीना तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार केंद्रे यांनी घटनास्थळाची पाहणी करून घटनेची माहिती घेतली. त्यामुळे प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलिस तपासाला वेग आला आहे. या प्रकरणी कुरुंदा पोलिस ठाण्यात खुनासह इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गंधकवाड हे करीत आहेत.
दरम्यान, भरदिवसा पेट्रोलपंप परिसरात झालेल्या या (Petrol pump murder case) हल्ल्यामुळे चोंडी परिसरात खळबळ उडाली आहे. हल्ल्यामागील नेमका वाद, आरोपींची भूमिका आणि घटनेचा संपूर्ण घटनाक्रम तपासातून स्पष्ट होणार आहे.