भोगाव जि.प.शाळेत दोनच शिक्षक कार्यरत; विद्यार्थ्यांसह पालकांचा ठिय्या
परभणी/जिंतूर (Parbhani Teachers' Protest) : तालुक्यातील भोगाव (देवी) जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिली ते नववीचे वर्ग आहेत. शाळेत सध्या १०५ विद्यार्थी संख्या असताना केवळ दोनच शिक्षक कार्यरत आहेत. शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने संतप्त पालक, विद्यार्थी व ग्रामस्थांनी गुरुवार २४ सप्टेंबर जिंतूर गटसाधन केंद्रातील गटशिक्षणाधिकारी यांच्या दालनातच शाळा भरवून ठिय्या आंदोलन केले.
भोगाव येथील जि.प. शाळेत पूर्वी चार शिक्षक कार्यरत होते. त्यापैकी दोन शिक्षकांची बदली झाली आहे. शाळेत केवळ दोन शिक्षक कार्यरत आहेत. त्यामुळे इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांना दोन शिक्षकाने शिकवायचे कसे?, असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला. शिक्षक नियुक्त करण्याची मागणी करुनही दखल घेण्यात न आल्याने ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली. गुरुवारी आंदोलनाची माहिती मिळताच शिक्षण विभागातील अधिकारी त्र्यंबक पोले, केंद्रप्रमुख तोडकर व कर्मचारी राजेंद्र ढाकणे, प्रभाकर नालंदे यांनी ग्रामस्थ, पालकांशी संवाद साधला. गट शिक्षणाधिकारी प्रगती नेव्हल यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. पालकांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची व्यथा मांडली. दोन शिक्षक जैसे थे ठेवण्याचे तोंडी आश्वासन मिळाल्याने आंदोलन तात्पुरते मागे घेतले आहे. मात्र पुन्हा शिक्षकांची बदली करून विद्यार्थ्यांवर अन्याय झाल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल,’ असा इशारा पालक शेख सत्तार यांनी दिला.
वरिष्ठांशी चर्चा करुन अंतिम निर्णय
बदली झालेल्या दोन शिक्षकांपैकी एका शिक्षकाचा विषय बदलल्याने त्याला भोगाव येथेच ठेवण्यात येईल. दुसर्या शिक्षकाबाबत भोगाव की चारठाणा, याबाबत मुख्य कार्यकारी अधिकार्यांच्या आदेशानुसार निर्णय घेतला जाणार असल्याचे गट शिक्षणाधिकारी प्रगती नेव्हल यांनी सांगितले.