पाळोदी वीजपुरवठा

पाळोदीत तीन फेज वीजपुरवठा ठप्प; पिके करपण्याच्या मार्गावर

Palodi Power Supply: तालुक्यातील पाळोदी परिसरातील शेतकऱ्यांना मागील एक ते दोन महिन्यांपासून सुरळीत तीन फेज वीजपुरवठा मिळत नसल्याने शेतीपिकांचे मोठे नुकसान होत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली

पाळोदीत तीन फेज वीजपुरवठा ठप्प; पिके करपण्याच्या मार्गावर

Palodi Power Supply

 

शेतकऱ्यांचे सहाय्यक अभियंत्यांना निवेदन; रात्री नियमित तीन फेज वीज देण्याची मागणी

कळमनुरी (Palodi Power Supply) : तालुक्यातील पाळोदी परिसरातील शेतकऱ्यांना मागील एक ते दोन महिन्यांपासून सुरळीत तीन फेज वीजपुरवठा मिळत नसल्याने शेतीपिकांचे मोठे नुकसान होत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. मागील पाच ते सहा दिवसांपासून वीजपुरवठा पूर्णपणे बंद असल्याने पिकांना पाणी देता येत नसून, शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. याबाबत पाळोदी येथील शेतकऱ्यांच्या वतीने १६ सप्टेंबर रोजी सहाय्यक अभियंत्यांना निवेदन देण्यात आले. मागील एक ते दोन महिन्यांपासून शेतातील वीजपुरवठ्यात वारंवार फॉल्ट निर्माण होत असून, वीज अत्यंत कमी दाबाने (डिम) मिळत असल्याचे शेतकऱ्यांनी निवेदनात नमूद केले आहे. त्यामुळे कृषी पंपांसह इतर शेतीची यंत्रे चालविण्यात अडचणी निर्माण होत आहेत.

वीजपुरवठ्याबाबत (Palodi Power Supply) संबंधित लाईनमनकडे विचारणा केली असता, ‘वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोला, फिल्टरवर लोड असल्यामुळे वीज टिकत नाही,’ असे सांगण्यात येत असल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे. तसेच पाळोदीच्या सबस्टेशनला इतर गावांचा विद्युत भार जोडण्यात आल्यामुळे पाळोदी परिसरातील वीजपुरवठ्यावर परिणाम होत असल्याचेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

सध्या पिकांना पाण्याची अत्यंत आवश्यकता असताना (Palodi Power Supply) वीजपुरवठा खंडित झाल्याने शेतकऱ्यांचे न भरून येणारे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे संबंधित विद्युत यंत्रणेने तातडीने फॉल्ट दूर करून पाळोदी परिसरातील शेतकऱ्यांना रात्री नियमित तीन फेज वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास हातातोंडाशी आलेली पिके वाया जाण्याची शक्यता असल्याने महावितरण प्रशासनाने तातडीने दखल घेऊन समस्या सोडवावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. निवेदनावर अनेक शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत

टैग्स: Palodi Power Supply