विविध शासकीय योजना व दाखल्यांचा एकाच छताखाली मिळणार लाभ
नागरिकांनी लाभ घेण्याचे तहसीलदार प्रतिक्षा तेजनकर यांचे आवाहन
रिसोड (Nomadic Tribes Campaign) : महाराष्ट्र शासनाच्या "राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता" अभियानांतर्गत विमुक्त जाती व भटक्या जमाती (VJNT) प्रवर्गातील नागरिकांना विविध शासकीय योजना आणि प्रमाणपत्रांचा थेट लाभ मिळवून देण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर रिसोड तहसिल कार्यालयाच्या वतीने मोप महसूल मंडळातील मौजे मांडवा येथे सोमवार, दिनांक २८ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत "भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियान" शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
शासनाच्या १५ सप्टेंबर २०२६ च्या परिपत्रकानुसार, २७ ते २९ सप्टेंबर दरम्यान प्रत्येक तालुक्यात अशा विशेष शिबिरांचे आयोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार मांडवा येथे हे एकदिवसीय शिबिर संपन्न होणार आहे. या शिबिरामध्ये रिसोड तालुक्यातील विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत. नागरिकांना आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, शिधापत्रिका (रेशन कार्ड), जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, नॉन-क्रिमीलेअर, रहिवासी व अधिवास दाखला, दिव्यांग प्रमाणपत्र, विवाह नोंदणी आणि आयुष्मान भारत कार्ड जागेवरच उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
याशिवाय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, प्रधानमंत्री आवास योजना आणि पीएम किसान योजना यांसारख्या विविध कल्याणकारी योजनांचे अर्ज स्वीकारून नियमानुसार पात्र लाभार्थ्यांना थेट लाभ दिला जाणार आहे. शिबिरादरम्यान नागरिकांच्या अडचणी समजून घेऊन त्याचे जागेवरच तात्काळ निवारण केले जाईल.
मांडवा व परिसरातील विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील जास्तीत जास्त नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह या शिबिराला उपस्थित राहून शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन रिसोडच्या तहसीलदार प्रतिक्षा तेजनकर यांनी केले आहे.