ऑनलाईन पसंतीक्रम नोंदवण्याची प्रक्रिया पूर्ण; १ ते १५ ऑक्टोबरदरम्यान बदली आदेश जारी होणार
मुंबई महानगरपालिकेतील अभियंत्यांच्या बदली प्रक्रियेत प्रशासनाने महत्त्वपूर्ण बदल केला आहे. बदल्यांमध्ये मानवी हस्तक्षेप कमी करण्यासाठी आता ऑनलाईन ‘Employee Transfer System Based on Randomization’ प्रणालीचा वापर करण्यात येत आहे. या माध्यमातून एकाच विभागात किंवा पदावर दीर्घकाळ कार्यरत असलेल्या सुमारे ८०० कनिष्ठ, उप आणि सहाय्यक अभियंत्यांच्या बदल्यांची प्रक्रिया पुढे जाणार आहे.
महापालिकेच्या काही महत्त्वाच्या आणि संवेदनशील विभागांमध्ये अनेक अभियंते वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे बदली प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणण्याच्या उद्देशाने प्रशासनाने संगणकीकृत रँडमायझेशन पद्धतीचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला आहे.
यापूर्वी महापालिकेतील अभियंत्यांच्या बदल्यांवरून राजकीय हस्तक्षेप आणि कथित आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप झाले होते. एप्रिल २०२६ मध्ये करण्यात आलेल्या १२२ अभियंत्यांच्या बदल्याही या आरोपांच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आल्या होत्या. त्यानंतर बदली प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी प्रशासनाकडून ऑनलाईन प्रणाली लागू करण्यात आली आहे.
नव्या पद्धतीनुसार ५ सप्टेंबर ते २० सप्टेंबर २०२६ या कालावधीत संबंधित अभियंत्यांकडून ऑनलाईन पसंतीक्रम मागविण्यात आला. १८ सप्टेंबरपर्यंत सुमारे ४९४ अर्ज प्रशासनाकडे प्राप्त झाले होते. अर्जांची छाननी आणि त्यानंतरची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर १ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत बदली आदेश जारी केले जाणार आहेत.
मानवी हस्तक्षेप कमी करण्याचा प्रयत्न
रँडमायझेशन प्रणालीच्या माध्यमातून अभियंत्यांच्या बदल्यांमध्ये व्यक्तीगत हस्तक्षेपाला मर्यादा घालण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. त्यामुळे कोणत्या अभियंत्याची कोणत्या विभागात नियुक्ती होणार, याकडे महापालिका वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
विशेषतः दीर्घकाळ एकाच ठिकाणी कार्यरत असलेल्या अभियंत्यांच्या बदल्यांमुळे महापालिकेच्या विविध अभियांत्रिकी विभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर फेरबदल होण्याची शक्यता आहे. सुमारे ८०० अभियंत्यांच्या बदल्यांची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर महापालिकेतील विभागीय कार्यपद्धतीतही बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.