आमदारा श्वेता महाले-पाटील

चिखलीत 'सुई-धाग्या'ची नवी राजकीय नांदी! 'ताई-भाऊ' यांची पहिलीच 'सार्वजनिक भेट'

MLA Shweta Mahale-Patil: चिखली विधानसभा मतदारसंघात ज्या दोन प्रमुख नेत्यांच्या राजकीय संघर्षाची राज्यभर चर्चा असायची, त्या विद्यमान भाजप आमदारा श्वेताताई महाले-पाटील आणि माजी आमदार राहुल भाऊ बोंद्रे

चिखलीत 'सुई-धाग्या'ची नवी राजकीय नांदी! 'ताई-भाऊ' यांची पहिलीच 'सार्वजनिक भेट'

MLA Shweta Mahale-Patil

 

ब्रह्मांडनायक गणेशाच्या चरणी 'गणपती बाप्पा मोरया'चा जल्लोष

चिखली (MLA Shweta Mahale-Patil) : चिखली विधानसभा मतदारसंघात ज्या दोन प्रमुख नेत्यांच्या राजकीय संघर्षाची राज्यभर चर्चा असायची, त्या विद्यमान भाजप आमदारा श्वेताताई महाले-पाटील आणि माजी आमदार राहुल भाऊ बोंद्रे यांच्यातील 'विळ्या-भोपळ्याचे' नाते आता पूर्णपणे बदलल्याचे चित्र रविवारी सायंकाळी पाहायला मिळाले. राहुल बोंद्रे यांनी सोशल मीडियाद्वारे भाजप प्रवेशाची अधिकृत घोषणा केल्यानंतर, अवघ्या काही तासांतच दोन्ही दिग्गज नेत्यांची गणेश दर्शन करताना झालेली अचानक भेट संपूर्ण शहरात राजकीय चर्चेचा मुख्य विषय ठरली आहे.

​रविवारी सायंकाळी ४:४५ वाजेच्या सुमारास चिखली शहरातील खंडाळा रोडवर दोन्ही नेते आपापल्या समर्थकांसह श्री गणेशाच्या दर्शनासाठी फिरत असताना 'ब्रह्मांडनायक गणेश मंडळा'च्या गेटवर अचानक समोरासमोर आले. एरवी यापूर्वी दोन्ही नेते आणि त्यांचे कार्यकर्ते एकमेकांसमोर येणे शक्यतो टाळायचे. मात्र, राहुल बोंद्रे यांच्या नव्या राजकीय भूमिकेनंतर पहिल्यांदाच हे दोन्ही नेते ऐन गल्लीत अचानक समोरासमोर आले आणि ही ऐतिहासिक भेट घडली.

​या वेळी एक विशेष राजकीय सौजन्याचा प्रसंगही पाहायला मिळाला. खंडाळा रोडवरील अरुंद गल्लीत समोरासमोर दोन गणेश मंडळे आहेत. एका मंडळाचे दर्शन घेऊन दुसऱ्या मंडळाकडे जात असताना आमदार श्वेताताई महाले यांची गाडी पुढे गेल्याने रस्ता अरुंद असल्यामुळे गाडी जाण्यास अडचण निर्माण होणार होती. ही बाब लक्षात येताच राहुल भाऊ बोंद्रे यांच्या चालकाने प्रसंगावधान राखत गाडी मागे (रिव्हर्स) घेऊन  ताईंच्या गाडीला रस्ता मोकळा करून दिला.

​त्यानंतर ब्रह्मांडनायक गणेश मंडळाच्या गेटवर दोन्ही नेते समोरासमोर आले असता त्यांनी एकमेकांना हसतमुखाने नमस्कार केला. एकमेकांचे पारंपरिक राजकीय प्रतिस्पर्धी मानले जाणारे हे दोन्ही चेहरे अशा प्रकारे एकत्र आल्याचे पाहून दोन्ही बाजूंच्या समर्थकांनी व कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करत 'गणपती बाप्पा मोरया'च्या जयघोषाने परिसर दुमदुमून टाकला.

​'विळ्या-भोपळ्या'च्या नात्याला 'सुई-धाग्या'ची जोड

आत्तापर्यंतच्या राजकीय समीकरणांमध्ये या दोन नेत्यांमध्ये नेहमीच कडक संघर्ष आणि 'विळ्या-भोपळ्या'सारखे वैर पाहायला मिळाले होते. परंतु, आता राहुल बोंद्रे यांच्या भाजप प्रवेशामुळे हे दोन्ही नेते एकाच पक्षात काम करणार आहेत. ज्याप्रमाणे सुई आणि धागा कापडाला एकत्र शिवण्याचे व विणण्याचे काम करतो, त्याच धर्तीवर भारतीय जनता पार्टीच्या संघटनेच्या माध्यमातून हे दोन्ही भक्कम चेहरे आता चिखलीच्या विकासासाठी एकत्र विणले जाणार असल्याचे या अचानक झालेल्या भेटीतून अधोरेखित झाले आहे.

​ब्रह्मांडनायक गणेशाच्या दरबारात घडलेल्या या अचानक भेटीचे साक्षीदार चिखलीचे नगराध्यक्ष पंडितराव देशमुख यांच्यासह दोन्ही बाजूंचे अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते ठरले असून या 'ताई-भाऊ'च्या पहिल्याच सार्वजनिक भेटीची संपूर्ण शहरात आणि राजकीय गोटात जोरदार चर्चा रंगली आहे.
 

टैग्स: MLA Shweta MahalePatil