मसेली आश्रमशाळा विद्यार्थिनी बेपत्ता

मसेली आश्रमशाळेत सुरक्षेचा फज्जा? मध्यरात्री दोन विद्यार्थिनी आश्रमशाळेबाहेर, सकाळी लागला शोध!

Ashram School Student Missing: आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजनांचे दावे केले जात असले, तरी प्रत्यक्ष परिस्थिती मात्र वेगळीच असल्याचे मसेली येथील घटना

मसेली आश्रमशाळेत सुरक्षेचा फज्जा? मध्यरात्री दोन विद्यार्थिनी आश्रमशाळेबाहेर, सकाळी लागला शोध!

Ashram School Student Missing

 

“प्रत्येक विद्यार्थ्याकडे पाहिजे त्या प्रमाणात लक्ष देता येत नाही”: मुख्याध्यापक वरखडे यांची कबुली

कोरची (Ashram School Student Missing) : आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजनांचे दावे केले जात असले, तरी प्रत्यक्ष परिस्थिती मात्र वेगळीच असल्याचे मसेली येथील घटनेने समोर आणले आहे. २५ मंजूर पदांपैकी तब्बल १२ पदे रिक्त असल्याने अवघ्या १३ कर्मचाऱ्यांच्या भरवशावर सुरू असलेल्या शासकीय आश्रमशाळेत इयत्ता दहावीच्या दोन विद्यार्थिनी मध्यरात्री आश्रमशाळेबाहेर गेल्या. विशेष म्हणजे, या दोघी बेपत्ता झाल्याचे दुसऱ्या दिवशी सकाळी ८ ते ८.३० वाजताच्या सुमारास नाश्त्याच्या वेळी लक्षात आले. त्यामुळे विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी असलेल्या देखरेख व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

२९ सप्टेंबरच्या रात्री सुमारे १२ वाजताच्या सुमारास दोन्ही विद्यार्थिनी आश्रमशाळेतून (Ashram School Student Missing) बाहेर पडल्याचे सांगण्यात येते. मात्र रात्रीच्या वेळीच त्यांच्या गैरहजेरीची नोंद किंवा शोध घेण्यात आला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्याच्या वेळी इतर विद्यार्थिनींनी त्या उपस्थित नसल्याचे शिक्षकांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर ही बाब उघडकीस आली.

अधीक्षिका बाहेरगावी, देखरेखीची जबाबदारी शिक्षिकेकडे

२८ सप्टेंबर रोजी शाळा व्यवस्थापन समितीच्या प्रशिक्षणासाठी अधीक्षिका वानखेडे या गडचिरोली येथे गेल्या होत्या. २९ सप्टेंबरला साप्ताहिक सुट्टी असल्याने त्या गडचिरोलीहून नागपूरला रवाना झाल्या. त्यांच्या अनुपस्थितीत विद्यार्थिनींच्या देखरेखीची जबाबदारी शिक्षिका कु. के. एस. नेवारे यांच्याकडे सोपविण्यात आली होती. त्या रात्री सुमारे १० वाजेपर्यंत वसतिगृहात उपस्थित होत्या.

मोबाईलमुळे युवकाच्या संपर्कात; पोलिसांच्या मदतीने शोध

या घटनेला मोबाईलचा धागाही जोडला गेला आहे. २७ सप्टेंबर रोजी अधीक्षिका वानखेडे यांना एका विद्यार्थिनीकडे अँड्रॉइड मोबाईल आढळून आला होता. आश्रमशाळेत मोबाईल वापरण्यास परवानगी नसल्याने त्यांनी तो जप्त करून मुख्याध्यापकांना माहिती दिली. मुख्याध्यापकांनी संबंधित (Ashram School Student Missing) विद्यार्थिनीच्या आई-वडिलांशी संपर्क साधला असता, त्यांनी मुलीला मोबाईल दिला नसल्याचे सांगितले. मात्र मोबाईल कोणी दिला, याबाबत विद्यार्थिनीने माहिती देण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर अधीक्षिकांनी मोबाईल स्वतःच्या खोलीत ठेवला होता. मात्र त्यांच्या अनुपस्थितीची खात्री करून संबंधित विद्यार्थिनीने अधीक्षिकेच्या खोलीतून मोबाईल पुन्हा घेतल्याचे सांगण्यात येते. या मोबाईलच्या माध्यमातून ती एका युवकाच्या संपर्कात असल्याची बाब तपासात समोर आली.

मुख्याध्यापकांनी पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर पोलीस निरीक्षक डोम यांनी मोबाईलच्या आधारे शोध घेतला. अखेर मसेलीपासून सुमारे ४५ किलोमीटर अंतरावरील कुरखेडा येथे दोन्ही विद्यार्थिनी आढळून आल्या.

कोटगुलच्या घटनेनंतरही प्रशासनाला जाग येणार कधी?

विशेष म्हणजे, मागील महिन्यात कोरची तालुक्यातील कोटगुल आश्रमशाळेतील (Ashram School Student Missing) इयत्ता नववीच्या विद्यार्थिनीचा मलेरियामुळे मृत्यू झाला होता. त्या घटनेनंतर आश्रमशाळांमधील आरोग्य सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या देखरेखीचा प्रश्न चर्चेत आला होता. आता मसेलीतील दोन विद्यार्थिनी मध्यरात्री आश्रमशाळेबाहेर गेल्याने सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

२५ पैकी १२ पदे रिक्त; मुख्याध्यापकांची कबुली

मसेली येथील शासकीय आश्रमशाळेत एकूण २५ मंजूर पदांपैकी १२ पदे रिक्त आहेत. परिणामी, केवळ १३ कर्मचाऱ्यांवर शाळेचा कारभार सुरू आहे. मुख्याध्यापक वरखडे यांनीही रिक्त पदांची वस्तुस्थिती मान्य करताना, “प्रत्येक विद्यार्थ्याकडे पाहिजे त्या प्रमाणात लक्ष देता येत नाही,” अशी कबुली दिली.

विद्यार्थ्यांच्या शिक्षणासोबतच त्यांच्या आरोग्याची आणि सुरक्षिततेची जबाबदारीही आश्रमशाळा प्रशासनाची आहे. मात्र मनुष्यबळाचा अभाव आणि रात्रीच्या देखरेखीतील त्रुटी यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. एका विद्यार्थिनीच्या आरोग्याचा प्रश्न आणि आता दोन विद्यार्थिनी मध्यरात्री बाहेर जाण्याची घटना समोर आल्यानंतरही प्रशासन रिक्त पदे भरणार कधी? रात्रीची सुरक्षा व्यवस्था सक्षम करणार कधी? असा सवाल पालक आणि नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

संबंधित सामग्री

मध्यरात्री आश्रमशाळेतून दोन विद्यार्थिनी गायब; चार तासांत पोलिसांनी शोधले

मध्यरात्री आश्रमशाळेतून दोन विद्यार्थिनी गायब; चार तासांत पोलिसांनी शोधले

Ashram School Girl Student Missing: कोरचीपासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या मसेली येथील शासकीय आश्रमशाळेतून इयत्ता दहावीमध्ये शिकणाऱ्या दोन विद्यार्थिनी निघून गेल्याचा धक्कादायक प्रकार

Sep 30, 2026