मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त लातूरमध्ये मुख्य शासकीय सोहळा उत्साहात
लातूर (Marathwada Liberation Day) : यंदा एल-निनोमुळे जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अतिशय कमी राहिले आहे. त्यामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या परिस्थितीची राज्य शासनाने गांभीर्याने दखल घेतली आहे, या संकट काळात राज्य शासन बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, अशी ग्वाही पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी गुरुवारी येथे दिली. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त लातूर येथील मुख्य शासकीय राष्ट्रध्वज वंदन सोहळ्यात ते बोलत होते.
यावेळी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उषाताई पाटील, खासदार डॉ. शिवाजी काळगे, महापौर जयश्री सोनकांबळे, जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, पोलीस अधीक्षक अमोल तांबे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल कुमार मीना, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त राहुल कुलकर्णी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दयानंद सुरवसे, उपमहापौर ॲड. स्नेहल उटगे यांच्यासह स्वातंत्र्य सेनानी, त्यांचे कुटुंबिय, माजी सैनिक उपस्थित होते.
युवकांना रोजगार आणि उद्योजकतेच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी येत्या २९ सप्टेंबर रोजी लातूर जिल्ह्यात एकाच दिवशी १३ ठिकाणी पंडित दीनदयाळ उपाध्याय ‘रोजगार महाकुंभ’ चे आयोजन करण्यात आले असून यात जास्तीत जास्त तरुण-तरुणींनी सहभाग नोंदवावा, असे आवाहनही पालकमंत्री श्री. भोसले यांनी यावेळी केले.
प्रारंभी पालकमंत्र्यांनी हुतात्मा स्मारक स्मृतीस्तंभास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. पोलीस दलातर्फे शस्त्र सलामी, मानवंदनेनंतर ध्वजवंदन करण्यात आले. मराठवाडा मुक्ती संग्राम दिन (Marathwada Liberation Day) हा खऱ्या अर्थाने भारतीय स्वातंत्र्याच्या पूर्णत्वाचा सुवर्णदिवस आहे. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखालील या ऐतिहासिक लढ्यात लातूरच्या अनेक थोर स्वातंत्र्यसेनानींनी आणि सामान्य जनतेने दिलेले योगदान व त्यांचा त्याग प्रेरणादायी आहे. या लढ्याला भारताचे तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभ पटेल यांच्या मध्यस्थीने यश मिळाले. १३ सप्टेंबर १९४८ रोजी पोलिस ॲक्शन सुरू झाले आणि १७ सप्टेंबर १९४८ रोजी मराठवाडा निजामाच्या राजवटीतून मुक्त झाला, असेही पालकमंत्री भोसले म्हणाले.