चिखली (Author Anil Chavan) : चिखली तालुक्यातील येवता येथील लेखक, कवी व शिक्षक अनिल भगवान चव्हाण (एबीसी) यांना शेगाव येथे आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात 'राज्यस्तरीय कर्तव्यदक्ष पुरस्कार' प्रदान करून सन्मानित करण्यात आले. संकल्प बहुउद्देशीय संस्था, अकोला आणि ग्रामीण युवा बहुउद्देशीय संस्था, तुलंगा यांच्या संयुक्त विद्यमाने शेगाव येथील द्वारका लॉन्समध्ये आयोजित कार्यक्रमात उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्या हस्ते अनिल चव्हाण यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यावेळी नगरसेवक गजानन कांबळे, नगराध्यक्ष प्रभाकर शेगोकार, सम्राट संघटनेचे अध्यक्ष आकाश सिरसाट, संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र इंगळे, सचिव प्रतीक्षा वासनिक यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. पुरस्कार प्रदान करताना प्रा. संजय खडसे यांनी अनिल चव्हाण हे आपले विद्यार्थी असल्याचा उल्लेख करत त्यांच्या साहित्यिक व सामाजिक कार्याचे कौतुक केले. त्यांच्या कार्याचा अभिमान वाटत असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.
अनिल चव्हाण (Author Anil Chavan) यांना सन २०२६ मधील हा तिसरा राज्यस्तरीय पुरस्कार ठरला आहे. त्यांचे 'शोध सुखाचा' हे पुस्तक वाचकांमध्ये लोकप्रिय ठरत असून या पुस्तकामुळे त्यांच्या साहित्यिक कार्याला व्यापक दाद मिळत आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्यास पाचशेहून अधिक नागरिक उपस्थित होते. या राज्यस्तरीय सन्मानाबद्दल अनिल चव्हाण यांच्यावर विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.