वसमत (Maratha Reservation) : मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी आणि संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांवर तात्काळ तोडगा काढण्याच्या मागणीसाठी आज वसमत येथे अभूतपूर्व आंदोलन पाहायला मिळाले. शेकडो बैलजोड्या घेऊन मराठा बांधवांनी वसमत तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढत शासनाचा निषेध केला.
बळीराजाचा सण असलेल्या बैलपोळ्याचे औचित्य साधून सकल मराठा समाजाने हा अनोखा मोर्चा काढला होता. सजवलेल्या बैलजोड्या, गळ्यात घंटा, अंगावर झुली आणि बैलांच्या शिंगांना रंगवून शेतकरी तहसील कार्यालयासमोर दाखल झाले. यावेळी संपूर्ण तहसील परिसर भगवामय झाला होता.
तहसीलला फेरी मारून शासनाचा निषेध
वसमत शहरातील सत्यनारायण टाॅकीज,झेंडा चौक,शहर पोलीस स्टेशन,गवळी मारोती मंदिर,तहसील कार्यालय असा भव्य बैल मोर्चा काढण्यात आला वसमत शहर व परिसरातील शेकडो शेतकऱ्यांनी आपल्या बैलजोड्या घेऊन तहसील कार्यालयाला फेरी मारली. "एक मराठा, लाख मराठा", "आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे", "मनोज दादा तुम आगे बढो" अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

यावेळी आंदोलकांनी राज्य सरकारचा निषेध करत, मराठा समाजाच्या न्याय मागण्यांवर तात्काळ निर्णय घ्यावा, अशी मागणी केली. उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.या निवेदनात म्हटले आहे की, अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेले आमरण उपोषण आणि वसमत तहसील समोर रविकिरण वाघमारे यांचे उपोषण याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. सरकारने तात्काळ मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन OBC प्रवर्गातून आरक्षण द्यावे.
यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने इशारा देण्यात आला की, "जर लवकरात लवकर मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर संपूर्ण मराठा समाज रस्त्यावर उतरेल. याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची असेल. आज आम्ही बैलजोड्या आणल्या, उद्या हजारो ट्रॅक्टर घेऊन मुंबईकडे कूच करू."
या (Maratha Reservation) मोर्चामुळे वसमत शहरातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. वसमत पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. मोर्चा शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. हा मोर्चा कोणत्याही राजकीय पक्षाचा नसून, शेतकरी आणि सकल मराठा समाज वसमत शहर यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. यात तरुण, ज्येष्ठ आणि शेतकऱ्यांचा मोठा सहभाग होता.