महावितरण परिपत्रक

वीज खांबावरील कामासाठी खासगी व्यक्तींना लावल्यास कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई होणार

Mahavitaran's strict circular: महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने विद्युत वितरण यंत्रणेच्या कामांबाबत अत्यंत गंभीर परिपत्रक काढले आहे. विद्युत वाहिन्या आणि उपकरणांवर अनधिकृत, खासगी व्यक्तीं..

वीज खांबावरील कामासाठी खासगी व्यक्तींना लावल्यास कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई होणार

Mahavitaran's strict circular

 

महावितरणचे कडक परिपत्रक

हिंगोली (Mahavitaran's strict circular) : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने विद्युत वितरण यंत्रणेच्या कामांबाबत अत्यंत गंभीर परिपत्रक काढले आहे. विद्युत वाहिन्या आणि उपकरणांवर अनधिकृत, खासगी व्यक्तींकडून कामे करून घेण्यास सक्त मनाई करण्यात आली असून, यापुढे असे प्रकार आढळल्यास संबंधित कर्मचाऱ्यावर बदली आणि सेवासमाप्तीपर्यंतची कठोर शिक्षा करण्यात येणार आहे.

महावितरणचे संचालक (संचालन) यांच्या (Mahavitaran) कार्यालयाकडून २४ सप्टेंबर २०२६ रोजी हे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. परिपत्रकात नमूद केल्यानुसार, विद्युत यंत्रणेचे सुरक्षित चालवणे, देखभाल- दुरुस्ती आणि ग्राहकांच्या तक्रारी तात्काळ सोडवणे हे संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांचे कर्तव्य आहे. यासाठी क्षेत्रीय कार्यालयांमध्ये तारमार्ग गटाचे मुख्य तंत्रज्ञ, ज्येष्ठ तंत्रज्ञ आणि तंत्रज्ञ यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांचे काम बिघडलेले वितरण रोहित्र बदलणे, वियोजक तारपट्टी बदलणे, वीज वाहिनीवरील बिघाड शोधणे, वीज पुरवठ्याची तक्रार सोडवणे आणि विद्युत मापक काढणे-लावणे हे आहे.

मात्र, काही ठिकाणी तारमार्ग कर्मचाऱ्यांच्यावतीने ही कामे पूर्ण करण्यासाठी खासगी, अनधिकृत मनुष्यबळाचा वापर केल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत क्षेत्रीय कार्यालय स्तरावर तक्रारीही मिळत आहेत. ही बाब अत्यंत गंभीर असून यामुळे जीवघेणा अपघात होऊन संबंधित व्यक्ती, कंपनीचे कर्मचारी आणि ग्राहकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. तसेच कंपनीच्या मालमत्तेचेही नुकसान झाले असून, यामुळे कंपनीची प्रतिमा लोकांमध्ये खराब होत असल्याचे परिपत्रकात म्हटले आहे.

केंद्रीय विद्युत प्राधिकरणाच्या २०२३ च्या सुरक्षा नियमावलीतील नियम ३ नुसार केवळ अधिकृत व्यक्तीच वीज वितरण सेवेची कामे करू शकते. अनधिकृत, अपात्र व्यक्तीस काम करण्याची परवानगी देणे हे कृत्य बेकायदेशीर असून कंपनीच्या सेवा नियमांनुसार गंभीर गैरवर्तन मानले जाते.

त्यामुळे यापुढे अनधिकृत मनुष्यबळाचा वापर करून कामे केल्याचे किंवा गैरवर्तनामुळे अपघात झाल्याचे आढळल्यास विभागीय स्तरावर चौकशी करून दोषी कर्मचाऱ्यां विरुद्ध कठोर कारवाई करावी. क्षेत्रीय कार्यालयातील मुख्य अभियंता आणि अधीक्षक अभियंता यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात अशा प्रकारचा वापर होत नसल्याची खातरजमा वेळोवेळी करावी, असे स्पष्ट आदेश संचालक धनंजय औंढेकर यांनी दिले आहेत.