हिंगोली (MP Ramrao Vadkute) : येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रशासकीय ध्वजारोहन प्रसंगी लोक प्रतिनिधींना अपमानास्पद वागणुक दिल्याच्या कारणातून खा. रामराव वडकुते यांनी जिल्हा प्रशासनाची खरडपट्टी काढली. यावेळी खा. नागेश पाटील आष्टीकर, आ. संतोष बांगर, आ. राजू नवघरे यांनीही या घटनेबद्दल नाराजी दर्शविली. त्यामुळे बराचवेळ एकच गोंधळ उडाला. पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी मध्यस्ती करून माफी मागितल्यानंतर या विषयावर पडदा पडला.
१५ ऑगस्टला स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहन सोहळ्याला खा. रामराव वडकुते (MP Ramrao Vadkute) , खा. नागेश पाटील आष्टीकर, आ. संतोष बांगर, आ. राजू भैय्या नवघरे हे ध्वजारोहन पुर्वी उपस्थित झाले होते. त्यानंतर पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांचे आगमन झाल्यावर त्यांनी प्रारंभी लोक प्रतिनिधींकडे जाऊन शुभेच्छा दिल्या. ध्वजारोहनाचा वेळ असल्याने जिल्हाधिकारी राहुल गुप्ता व जि.प. मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी पालकमंत्र्यांना ध्वजस्तंभाकडे नेले. परंतु लोक प्रतिनिधींकडे पाहुन आपण तेथेच बसुन रहा असे सांगितल्याने ही बाब उपस्थित लोक प्रतिनिधींच्या जिव्हारी लागली.

पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहन पार पडले. त्यानंतर ध्वजस्तंभाजवळ खा. रामराव वडकुते यांच्यासह इतर सर्व लोकप्रतिनिधींनी येऊन ध्वजारोहन प्रसंगी लोकप्रतिनिधींना जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीचा निषेध नोंदविला. यावेळी खा. रामराव वडकुते यांनी उपस्थित जिल्हाधिकारी राहुल गुप्ता व जि.प. सीईओ विवेक गायकवाड यांना खडेबोल सुनावले. ध्वजारोहनाच्या ठिकाणी शासकीय शिष्टाचार असतो हे आम्हाला मान्य आहे, परंतु ध्वजस्तंभापर्यंत येण्याकरीता आंमत्रित करण्या ऐवजी चक्क पेंडॉलमध्ये व्यवस्था केलेल्या ठिकाणीच थांबा असे म्हणणे चुकीचे असल्याचे सांगितले.
यावेळी खा. नागेश पाटील आष्टीकर, आ.संतोष बांगर, आ. राजूभैय्या नवघरे यांनीही जिल्हा प्रशासनाबद्दल नाराजी दर्शविली. दरम्यान ध्वजारोहन नंतर अनेकांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार होते. परंतु लोकप्रतिनिधींनी प्रशासनाची खरडपट्टी काढल्याने हा कार्यक्रम काहीवेळ लांबला. परंतु पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी लोकप्रतिनिधींची प्रत्यक्ष भेट घेऊन झालेल्या प्रकाराबाबत चुक झाल्याची कबुली देऊन त्यांची माफी मागितली. या प्रकारामुळे जिल्हा प्रशासनाची चांगलीच गोची झाली होती.