पोक्सो न्यायालयाचा निकाल; ५ हजार रुपये दंडाचीही शिक्षा
लातूर (Latur Sexual Assault Case) : भोळसर स्वभावाच्या १२ वर्षीय अल्पवयीन मुलीचा गैरफायदा घेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी पवन बाळासाहेब हरबडे (वय २१, रा. नागझरी, ता. जि. लातूर) यास अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. ए. सय्यद यांनी दोषी ठरवत २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व ५ हजार रुपये दंड सुनावला. नागझरी येथे आरोपीने १२ वर्षीय मुलीच्या भोळसर स्वभावाचा गैरफायदा घेत तिला लातूर शहर फिरवून आणण्याचे सांगितले. त्यानंतर तिला दुचाकीवरून पुणे येथे नेऊन, आरोपीच्या बहिणीच्या घरी कोणीही नसताना तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे तपासात निष्पन्न झाले.
या (Latur Sexual Assault Case) घटनेप्रकरणी गुन्ह्यातील नमूद फिर्यादी यांनी दि. २ फेब्रुवारी २०२५ रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा रजि. क्र. ७४/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १३७(१), ६४(२)(f)(m) तसेच पोक्सो कायदा कलम ४ व ८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्याचा तपास तत्कालीन एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक एस. जी. द्रोणाचार्य त्यांचे तपास मदतनीस पोलीस हवालदार गणेश मालवदे यांनी करून उपलब्ध पुरावे व साक्षींच्या आधारे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले.
या (Latur Sexual Assault Case) खटल्यात जिल्हा सरकारी वकील संतोष देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष सरकारी अभियोक्ता एम. एस. महिंद्रकर यांनी सरकारतर्फे प्रभावी बाजू मांडली. त्यांना अॅड. सोमेश्वर बिराजदार, अॅड. विद्या वीर व अॅड. पल्लवी यादव यांनी सहकार्य केले.
खटल्यादरम्यान प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, पंच, वैद्यकीय अधिकारी तसेच तपासी अधिकारी यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. ए. सय्यद यांनी दि. १ ऑक्टोबर २०२६ रोजी आरोपी पवन हरबडे यास दोषी ठरवून पोक्सो कायदा कलम ४ व भारतीय न्याय संहिता कलम ६४(२) अन्वये २० वर्षे कारावास व ५ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. या खटल्याच्या यशस्वी कामकाजासाठी ट्रायल मॉनिटरिंग सेलचे सहायक पोलीस निरीक्षक एस. व्ही. मनाळे तसेच पैरवी अंमलदार म.पो.ह. २८६ बी. टी. हिंगडे यांनी कामकाज पाहिले.