लातूर बाजार बंद

ऐन पेरणीच्या दिवसात लातूरचा आडत बाजार बंद!

Latur Bazar closed: लातूरच्या आडत बाजारासोमवारी बंद करण्यात आले. समितीच्या भंडणावर होणाऱ्या गटविरोधामुळे शनिवार नंतर सोमवारी बंद करण्यात आला.

ऐन पेरणीच्या दिवसात लातूरचा आडत बाजार बंद!

Latur Bazar closed


आज बैठक घेऊन तोडगा काढणार: सभापती बावणे 

महादेव कुंभार
लातूर (Latur Bazar closed) :
बाजार समिती परिसरात झालेल्या भंडारा पंगतीवेळी कुणीतरी तंबाखू खाऊन थुंकल्याच्या कारणावरून झालेल्या भांडणातून अखेर लातूर येथील आडत बाजार शनिवार नंतर सोमवारीही बंद ठेवण्यात आला. सोमवारी सकाळी सौदा निघण्याच्या वेळी हमालांनी विरोध केल्याने आडत बाजार बंद राहिला. दरम्यान या प्रकरणी सभापती जगदीश दादा बावणे यांच्याशी संपर्क साधला असता बाजार बंद बाबत आज सर्व घटकांची बैठक घेऊन तोडगा काढला जाईल, असे त्यांनी दैनिक देशोन्नतीशी बोलताना सांगितले. 

लातूरच्या उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आडत बाजारात लातूरसह लातूर जिल्ह्यातील तसेच धाराशिव आणि शेजारच्या बीड जिल्ह्यातील शेतमाल मोठ्या प्रमाणात येतो. या बाजार समितीत होणाऱ्या व्यवहारावर लातूरचे व्यवहार मोठ्या प्रमाणात चालतात. बाजार समितीतील उलाढालीवर लातूरच्या मार्केटचा व्यवहार चालतो. 

दरम्यान या (Latur Bazar closed) बाजार समितीत शुक्रवारी भंडारा उत्सव झाला. भंडाऱ्याची पंगत सुरू असतानाच या पंगतीवेळी कोणीतरी तंबाखू खाऊन थुंकले. त्याचा जाब विचारल्याने दोन गटांमध्ये चकमक उडाली. हमरी तुमरी झाली. याच कारणावरून शनिवारी लातूरचा आडत बाजार बंद ठेवण्यात आला. हा बाजार बंद होण्यास हमाल मापाडी वर्ग कारणीभूत असल्याचा करण्यात येत असला तरी हमाल मापाडी गाडीवान संघटनेचे नेते हर्षवर्धन सवई यांनी मात्र बाजार समिती बंद असल्याचा दावा खोडून काढला आहे. बाजार समिती बंदचे खापर हमाल वर्गावर फोडून हमालांना दोष देणे योग्य नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली. बाजार बंद आहे की नाही? याबाबत बाजार समितीच सांगू शकेल, असेही ते म्हणाले. 

दरम्यान या प्रकरणी बाजार समितीचे सचिव अरविंद पाटील यांच्याशी संपर्क साधला असता हमालांनी बाजार बंद ठेवला आहे, असे ते म्हणाले. याप्रकरणी सभापतींच्या उपस्थितीत तातडीची बैठक घेऊन यावर तोडगा काढण्यात येईल, असे ते म्हणाले. याबाबत बाजार समिती सभापती जगदीशदादा बावणे यांच्याशी संपर्क साधला असता बाजार बंद असल्याचे त्यांनी मान्य केले. याप्रकरणी आपण (Latur Bazar closed) बाजार समितीतील हमालांसह इतर सर्व घटकांना एकत्रित बसून आज तोडगा काढणार आहोत, असेही त्यांनी दैनिक 'देशोन्नती'शी बोलताना सांगितले.

पेरणीच्या दिवसात बाजार बंद ठेवणे योग्य नाही 

बाजार समितीमध्ये काही घटकांमध्ये भांडणे, तंटे झाले असतील तर त्यावर तात्काळ तोडगा काढणे आवश्यक आहे. कदाचित कोणाचा अवमान झाला असेल तर तात्काळ माफी मागून विषय संपवून पुढे कामकाज चालविले पाहिजे. सध्या पेरणीचे दिवस आहेत. शेतकऱ्यांपुढे अनेक आर्थिक अडचणी असतात, बाजार बंद ठेवल्यानंतर शेतकऱ्यांच्या या अडचणीमध्ये अधिक वाढ होणार आहे. याचा विचार सर्व घटकांनी करावा. 
-रुपेश शंके, युवा जिल्हाध्यक्ष शेतकरी संघटना, लातूर