जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करून हेक्टरी लाखाची मदत देण्याची मागणी
लातूर (Latur Dry Drought) : लातूर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा शेतकऱ्यांना तात्काळ हेक्टरी एक लाखाची मदत जाहीर करावी, या मागणी सह वाळलेल्या सोयाबीनची पेंडी देत मनसेने निलंग्याचे तहसीलदार कुलकर्णी यांना निवेदन दिले. जिल्हाध्यक्ष डॉ. नरसिंह भिकाने यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने तहसीलदारांमार्फत सरकारकडे ही मागणी केली.
जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये पावसाच्या मोठ्या खंडामुळे शेतकऱ्यांच्या कापूस, सोयाबीन, उडीद, मूग, धान, ज्वारी, बाजरी, मका, तूर, भाजीपाला, फळपिके आदी पिकांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे किती मिलिमीटर पाऊस पडला, नेमका खंड किती दिवसाचा होता? दुष्काळ जाहीर करणे सरकारी निकषात बसेल की नाही हे काहीही न पाहता प्रत्यक्ष नुकसान किती झाले आहे, हे पाहून ज्या-ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्या (Latur Dry Drought) लातूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करावा व दुष्काळाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी भरीव मदत करावी अशी मागणी करण्यात आली. आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी ५ ऑक्टोबर नंतर नुकसानीचे पंचनामे करणार असे सांगितले आहे.
मात्र महाराष्ट्रातील प्रमुख पिक असलेल्या सोयाबीनची काढणी ८ दिवसात सुरू होईल आणि मूग, उडीद, बाजरी,ज्वारी यांची तर काढणी अगोदरच झाली आहे. त्यामुळे काढणीनंतरचे पंचनामे म्हणजे 'वरातीमागून घोडे' असे होणार असल्याने शेतकऱ्यांना पंचनाम्यांच्या फेऱ्यात अडकवू नका. दुष्काळ जाहीर करून सरसकट सर्व शेतकऱ्यांना मदत करा, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ. नरसिंह भिकाने यांच्यासह जिल्हा सचिव प्रदीप शेळके, जिल्हा उपाध्यक्ष सूरज पटेल, तालुकाध्यक्ष सचिन बिराजदार, शहराध्यक्ष अबूबकर सय्यद, गणेश उसनाळे, विकास सूर्यवंशी, बालाजी पवार, सदाशिव हडोळे, सोमलिंग पाटील, शिवराज चिंचोळे आदींसह अनेक मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.