आ. अभिमन्यू पवारांनी घेतला बांधकाम प्रकल्पाचा आढावा
लातूर : लातूर जिल्ह्यात मराठा समाजाच्या शैक्षणिक व सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या ‘सारथी’ संस्थेच्या विभागीय कार्यालयाच्या उभारणीला वेग आला असून, या भव्य प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी आमदार अभिमन्यू पवार यांनी मराठा समाजबांधवांसह दि. २४ एप्रिल रोजी भेट दिली. या भेटीदरम्यान सुरू असलेल्या बांधकाम कामांची पाहणी करत प्रकल्पाच्या प्रगतीबाबत सविस्तर माहिती घेण्यात आली.

सन २०१८ मध्ये स्थापन झालेल्या सारथी संस्था (SARTHI) च्या लातूर विभागीय कार्यालयासाठी सुमारे १७२ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या अंतर्गत १२ मजल्यांच्या दोन भव्य इमारती उभारल्या जात असून, त्या अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असणार आहेत. प्रकल्पामध्ये ५०० विद्यार्थी क्षमतेचे वसतिगृह, ३०० विद्यार्थ्यांसाठी प्रशस्त अभ्यासिका, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र तसेच कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्राचा समावेश करण्यात आला आहे.
या प्रसंगी आमदार अभिमन्यू पवार यांनी सांगितले की, “ही इमारत केवळ एक प्रशासकीय केंद्र नसून मराठा समाजाच्या शैक्षणिक आणि करिअर उन्नतीचे प्रमुख केंद्र ठरेल.” त्यांनी प्रकल्पाच्या गुणवत्तेबाबत विशेष लक्ष देण्याच्या सूचना देत काम वेळेत पूर्ण करण्यावर भर दिला.भेटीदरम्यान बांधकामाच्या दर्जा, पायाभूत सुविधा आणि प्रकल्पाच्या एकूण प्रगतीचा सखोल आढावा घेण्यात आला. तसेच उपस्थित मराठा समाजाच्या प्रतिनिधींनी विविध सूचना मांडत प्रकल्प अधिक उपयुक्त कसा होईल यावर चर्चा केली.
लातूरमध्ये उभारले जाणारे हे ‘सारथी’ केंद्र भविष्यात मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन, निवास आणि कौशल्य विकासाचे एक सक्षम व्यासपीठ ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
उद्घाटनासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री येणार
सारथी प्रकल्पाच्या पाहणीदरम्यान काही तुटी व आवश्यक दुरुस्तींबाबत सूचना देण्यात आल्या असून त्या तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यावेळी आमदार अभिमन्यू पवार यांनी सांगितले की, ‘सारथी’च्या या भव्य इमारतीच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे प्रकल्प वेळेत व गुणवत्तापूर्ण पूर्ण करण्यावर विशेष भर देण्यात येत आहे.
जिल्हाधिकाऱ्यांची उपस्थिती
या पाहणीवेळी महेश पाटील (व्यवस्थापकीय संचालक, सारथी पुणे), भारत बास्टेवाड (जिल्हाधिकारी, लातूर), पालवणकर, तसेच उपव्यवस्थापकीय संचालक आम्रपाली कासोदेकर यांच्यासह अनेक अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. याशिवाय विद्युत व बांधकाम विभागातील अधिकारी, अभियंते तसेच कंत्राटदार संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.