मनमानी कारभारा मुळे शेतकरी त्रस्त
कुरुंदा (Kurunda Farmers' Protest) : येथील भारतीय स्टेट बँक शाखेच्या मनमानी कारभारामुळे शेतकरी त्रस्त झाले असून, सातत्याने होणाऱ्या पिळवणूक व हेळसांडीला कंटाळून ७ ऑक्टोबर बुधवार रोजी संतप्त शेतकऱ्यांनी बँकेच्या शाखेला टाळे ठोकून निषेध व्यक्त केला. या आंदोलनामुळे काही काळ बँकेचे कामकाज ठप्प झाले होते.
कुरुंदा परिसरात यावर्षी दुष्काळी परिस्थिती असताना शेतकऱ्यांना पीक कर्ज, केसीसी, पीक विमा भरपाई आणि शासनाच्या दुष्काळी मदतीसाठी बँकेत वारंवार चकरा माराव्या लागत आहेत. मात्र बँकेकडून कधी 'सर्व्हर डाऊन आहे', कधी 'लिंक नाही', कधी उद्या या तर कधी 'कागदपत्रे अपूर्ण आहेत' असे सांगून शेतकऱ्यांना ताटकळत ठेवले जात आहे.
दुष्काळ जाहीर होऊनही पीकविमा व कर्जमाफीचे पैसे खात्यात जमा होत नाहीत.केसीसी व नवीन कर्जासाठी विनाकारण सातबारा, होल्डिंग, फार्मर आयडी, आधार, पॅन कार्ड अशा कागदपत्रांची वारंवार मागणी केली जाते.शेतकरी बँकेत गेल्यावर कर्मचाऱ्यांकडून उद्धट वागणूक व टोलवाटोलवी केली जाते अशा तक्रारी केल्या आहेत
दरम्यान, बँक व्यवस्थापनाने तात्काळ शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल घेऊन सेवा सुरळीत करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकरी नेते आलोक इंगोले पाटील व शेतकऱ्यांनी दिला आहे. या (Kurunda Farmers' Protest) घटनेची माहिती मिळताच कुरुंदा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गंधकवाड यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली व कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी चोख बंदोबस्त लावला होता.