डायल 112 कॉल

डायल 112 कॉलला प्रतिसाद देण्यास दीड तास विलंब; कळमनुरीतील पोलीस अंमलदार निलंबित  

Dial 112 call: नागरिकांना तात्काळ पोलीस मदत मिळावी यासाठी सुरू करण्यात आलेल्या डायल 112 सेवेवर आलेल्या कॉलला प्रतिसाद देण्यास तब्बल दीड तास उशीर

डायल 112 कॉलला प्रतिसाद देण्यास दीड तास विलंब; कळमनुरीतील पोलीस अंमलदार निलंबित  

Dial 112 call

हिंगोली (Dial 112 call) : नागरिकांना तात्काळ पोलीस मदत मिळावी यासाठी सुरू करण्यात आलेल्या डायल 112 सेवेवर आलेल्या कॉलला प्रतिसाद देण्यास तब्बल दीड तास उशीर केल्याप्रकरणी पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी कळमनुरी पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार किशोर शंकर राठोड यांना तडकाफडकी निलंबित केले आहे. कर्तव्यात कसूर करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश यातून देण्यात आला आहे.  

महाराष्ट्र पोलिसांमार्फत डायल 112 (Dial 112 call) ही आपत्कालीन सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे. या क्रमांकावर पीडित व्यक्तीने कॉल केल्यानंतर कमीत कमी वेळेत पोलीस मदत पोहोचणे अपेक्षित आहे. पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन हे स्वतः या सेवेच्या अंमलबजावणीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना नागरिकांना दर्जेदार व तात्काळ सेवा देण्याबाबत त्यांनी कडक सूचना दिलेल्या आहेत.  

घटनेच्या तपशीलानुसार, दिनांक 12 मे 2026 रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास कळमनुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत डायल 112 वर मदतीसाठी एक कॉल आला. त्यावेळी डायल 112 कर्तव्यावर पोलीस अंमलदार 639/किशोर शंकर राठोड हे नियुक्त होते. नियमानुसार मर्यादित वेळेत घटनास्थळी पोहोचून पीडिताला मदत करणे त्यांचे कर्तव्य होते. मात्र, राठोड यांनी सदर कॉलला प्रतिसाद देण्यासाठी तब्बल दीड तासाचा विलंब केला. ही बाब पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ दखल घेतली.  

कर्तव्यात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, अशी भूमिका घेत डॉ. रोहन यांनी पोलीस अंमलदार किशोर शंकर राठोड यांच्या निलंबनाचे आदेश तात्काळ काढले. डॉ. नीलाभ रोहन हे कडक शिस्तीचे व कर्तव्य कठोर अधिकारी म्हणून ओळखले जातात. जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेवर त्यांचे काटेकोर नियंत्रण असून नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत. या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली असून डायल 112 सारख्या अत्यावश्यक सेवेतील दिरंगाई गंभीरपणे घेतली जाईल, असा संदेश यातून सर्व कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचला आहे.

टैग्स: Dial 112 call