शिक्षण सहसंचालक श्रीराम पानझडे यांच्यासोबत महासंघाची बैठक; सध्या उपलब्ध विद्यार्थीसंख्येनुसार माहिती भरण्याची मुभा, प्रॅक्टिकल बॅच व तासिकांच्या प्रश्नावर संघर्ष सुरूच राहणार
मुंबई : महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी आज, बुधवार दिनांक 29 सप्टेंबर 2026 रोजी शिक्षण सहसंचालक मा. श्रीराम पानझडे यांची भेट घेतली. यावेळी शैक्षणिक वर्ष 2025-26 मधील संचमान्यतेतील अडचणी तसेच प्रस्तावित 2026-27 च्या संचमान्यतेसंदर्भातील विविध प्रश्नांवर सविस्तर सहविचार सभा घेण्यात आली. बैठकीत UDISE+ पोर्टलवरील तांत्रिक व प्रशासकीय अडचणींबाबत सकारात्मक चर्चा झाली असून, बहुतांश तांत्रिक त्रुटी पुढील दोन-तीन दिवसांत दूर करण्याचे आश्वासन देण्यात आले.
2025-26 च्या संचमान्यतेमध्ये प्रॅक्टिकलच्या तुकडीतील विद्यार्थीसंख्या 20 पर्यंत मर्यादित करण्याचा तसेच तासिकांचा कालावधी बदलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे निर्माण झालेल्या अडचणी महासंघाने बैठकीत ठामपणे मांडल्या. राज्यातील संपूर्ण संचमान्यतेचा आढावा घेऊन याबाबत निर्णय घेतला जाईल, असे शिक्षण सहसंचालकांनी स्पष्ट केले. मात्र, प्रॅक्टिकलची बॅच पूर्ववत करणे आणि तासिकांचा कालावधी पूर्वीप्रमाणे कायम ठेवण्याबाबत आज कोणतेही ठोस आश्वासन मिळालेले नाही.
2026-27 संचमान्यतेबाबत महत्त्वाचे निर्णय
कनिष्ठ महाविद्यालयांची 2026-27 ची संचमान्यता भरताना UDISE+ पोर्टलवर येणाऱ्या अडचणींबाबत राज्यातील शिक्षकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारी आणि सूचनांची माहिती महासंघाने सहसंचालकांसमोर मांडली. त्यावर चर्चा करून विविध मुद्द्यांबाबत स्पष्टीकरण देण्यात आले.
1. संचमान्यतेसाठी स्वतंत्र अंतिम मुदत नाही
कनिष्ठ महाविद्यालयांच्या 2026-27 च्या संचमान्यतेची माहिती भरण्यासाठी सध्या स्वतंत्र अंतिम कालमर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही. 30 सप्टेंबर 2026 ही मुदत माध्यमिक विभागासाठी असल्याचे स्पष्ट करण्यात आले. कनिष्ठ महाविद्यालयांची प्रवेश प्रक्रिया अद्याप सुरू असल्याने त्यांच्यासाठी स्वतंत्र परिस्थिती विचारात घेतली जाणार आहे.
2. सध्या उपलब्ध विद्यार्थीसंख्या भरता येणार
UDISE+ पोर्टलवर सध्या उपलब्ध असलेली विद्यार्थीसंख्या संचमान्यतेसाठी नोंदवता येईल. अकरावीची प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थीसंख्येत बदल झाल्यास पुढील टप्प्यावर Edit/Update करता येणार आहे. त्यामुळे सध्या माहिती भरताना शिक्षकांनी संभ्रम बाळगण्याची गरज नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.
3. विविध विषयांची सुविधा उपलब्ध होणार
शिक्षणशास्त्र, गृहविज्ञान, डिझाईन, सहकार, भूगोल, संरक्षणशास्त्र, संगीत आणि तर्कशास्त्र आदी विषय UDISE+ वर उपलब्ध होत नसल्याची बाब महासंघाने निदर्शनास आणून दिली. सॉफ्टवेअरमध्ये आवश्यक दुरुस्ती करून पुढील दोन-तीन दिवसांत संबंधित विषयांची सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले. सर्व पात्र विद्यार्थी संचमान्यतेसाठी ग्राह्य धरले जातील, असेही स्पष्ट करण्यात आले.
4. संयुक्त तुकडीसाठी ‘Others’ किंवा ‘Composite’ Tab
संयुक्त तुकडीच्या नोंदीसाठी ‘Others’ किंवा ‘Composite’ Tab चा वापर करून विद्यार्थ्यांची माहिती भरावी, असे स्पष्ट करण्यात आले.
5. एकाच शाखेत दोन माध्यमे असल्यास स्वतंत्र विद्यार्थीसंख्या
एखाद्या कनिष्ठ महाविद्यालयात एकाच शाखेत दोन माध्यमे असल्यास प्रत्येक माध्यमातील विषयनिहाय विद्यार्थीसंख्या स्वतंत्रपणे विचारात घेतली जाणार आहे. सध्या माध्यम निवडताना येत असलेली तांत्रिक अडचण सॉफ्टवेअरमध्ये दुरुस्ती केल्यानंतर दूर करण्यात येईल.
6. तक्रारींसाठी स्वतंत्र App किंवा Helpline
संचमान्यतेसंदर्भातील कनिष्ठ महाविद्यालयांच्या अडचणी व तक्रारी नोंदवण्यासाठी स्वतंत्र App अथवा Helpline उपलब्ध करून देण्याची मागणी महासंघाने केली. ही मागणी शिक्षण सहसंचालकांनी मान्य केली असून, त्यादृष्टीने कार्यवाही करण्याचे आश्वासन देण्यात आले.
7. सांगली जिल्ह्यातील UDISE क्रमांकाचा प्रश्न
सांगली जिल्ह्यातील सुमारे 15 कनिष्ठ महाविद्यालयांना दोन UDISE क्रमांक असल्याची बाब महासंघाने बैठकीत मांडली. संबंधित तांत्रिक अडचण दूर करून योग्य पद्धतीने संचमान्यता करण्याचे मान्य करण्यात आले.
तांत्रिक त्रुटींमुळे शिक्षकांनी घाबरून जाऊ नये
UDISE+ पोर्टलवर सध्या दिसणाऱ्या अनेक त्रुटी या तांत्रिक स्वरूपाच्या असून त्या कायमस्वरूपी अडचणी नसल्याचे शिक्षण सहसंचालकांनी स्पष्ट केले. शिक्षक आणि महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी मांडलेल्या अडचणींवर बैठकीत सविस्तर चर्चा झाली. त्यातील बहुतांश तांत्रिक समस्या पुढील दोन-तीन दिवसांत दूर करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
त्यामुळे जिल्हा पातळीवर किंवा संबंधित प्राचार्य अथवा मुख्याध्यापकांकडून दिल्या जाणाऱ्या स्थानिक सूचनांकडे धमकी किंवा अंतिम शासकीय कालमर्यादा म्हणून पाहू नये, अशी विनंती महासंघाने केली आहे.
सध्या उपलब्ध असलेली माहिती शक्य तितकी भरावी. त्यानंतर अकरावीची प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाल्यावर विद्यार्थीसंख्या वाढल्यास किंवा त्यात बदल झाल्यास ती Edit/Update करता येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
प्रॅक्टिकल बॅच आणि तासिकांच्या प्रश्नावर संघर्ष कायम
2026-27 च्या संचमान्यतेशी संबंधित तांत्रिक व प्रशासकीय प्रश्नांवर बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असून त्यावर मार्ग काढण्याचे आश्वासन मिळाले आहे. मात्र, प्रॅक्टिकलच्या बॅचमधील विद्यार्थीसंख्या पूर्ववत करणे आणि तासिकांचा कालावधी पूर्वीप्रमाणे कायम ठेवणे या दोन प्रमुख मागण्यांवर अद्याप ठोस निर्णय झालेला नाही.
त्यामुळे या मागण्यांसाठी महासंघाचा संघर्ष सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. आगामी काळात आपल्या न्याय्य मागण्यांसाठी पुन्हा आंदोलनाची भूमिका घ्यावी लागू शकते, असे महासंघाने म्हटले आहे.
राज्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी केवळ WhatsApp संदेश, पोस्ट आणि चर्चांपुरता आपला सहभाग मर्यादित न ठेवता आगामी आंदोलनांमध्ये प्रत्यक्ष सहभागी व्हावे, असे आवाहन महासंघाने केले आहे. आपल्या प्रश्नांवर प्रत्यक्ष परिणाम साधण्यासाठी प्रत्येक शिक्षकाचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा असल्याचे महासंघाने नमूद केले.
आपली एकजूट, सहभाग आणि संघटित संघर्ष हाच न्याय्य मागण्यांच्या यशाचा मुख्य आधार असल्याचे सांगत, पुढील आंदोलनाची हाक दिल्यानंतर कोणतीही सबब न सांगता प्रत्येक शिक्षकाने संघटनेच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सहविचार सभेला महासंघाचे पदाधिकारी उपस्थित
आजच्या सहविचार सभेला शिक्षण सहसंचालक मा. श्रीराम पानझडे साहेब यांच्यासह महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे अध्यक्ष डॉ. संजय शिंदे, सचिव प्रा. लक्ष्मण रोडे, कोषाध्यक्ष डॉ. अशोक गव्हाणकर, उपाध्यक्ष प्रा. रविंद्र भदाणे, उपाध्यक्ष प्रा. शिवराम सूर्यवंशी, सहसचिव प्रा. दिलीप शितोळे, मार्गदर्शक प्रा. संतोष फाजगे आणि पुणे जिल्हाध्यक्ष प्राचार्य विक्रम काळे यांच्यासह महासंघाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसाठी महासंघाचा संघटित आणि सातत्यपूर्ण संघर्ष पुढेही सुरू राहणार असल्याचे महासंघाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
— महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ