आयटीआय व जि. प. शाळा रस्ता वाद

आयटीआय व जि. प. शाळा रस्ता वाद; मुख्य प्रवेशद्वारावर गाडी लावून रस्ता अडवल्याप्रकरणी शरद भाला यांच्यावर एफआयआर दाखल

ITI-ZP school Dispute: स्थानिक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) आणि जिल्हा परिषद शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावर गेल्या चार दिवसांपासून गाडी उभी करून विद्यार्थी व कर्मचाऱ्यांचा रस्ता अडव..

आयटीआय व जि. प. शाळा रस्ता वाद; मुख्य प्रवेशद्वारावर गाडी लावून रस्ता अडवल्याप्रकरणी शरद भाला यांच्यावर एफआयआर दाखल

ITI-ZP school Dispute

चिखली (ITI-ZP school Dispute) : स्थानिक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) आणि जिल्हा परिषद शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावर गेल्या चार दिवसांपासून गाडी उभी करून विद्यार्थी व कर्मचाऱ्यांचा रस्ता अडवल्याचा प्रकार अखेर पोलीस ठाण्यात पोहोचला आहे. आयटीआयचे प्राचार्य राजेश तुळशीराम शेगोकार (वय ३८) यांच्या तक्रारीवरून शरद बनशीलाल भाला यांच्याविरुद्ध चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
२१ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ७:३० वाजेच्या सुमारास आयटीआय कॉलेजच्या मुख्य गेटवर पांढऱ्या रंगाची वॅगनआर गाडी (क्रमांक MH 21 V 0972) आडवी लावून शैक्षणिक संस्थेचा सामायिक रस्ता बंद करण्यात आला होता. एवढेच नव्हे तर गाडीच्या काचावर सीसीटीव्ही छेडछाडीबाबत कागद लावून इशारा देण्यात आला होता. या प्रकारामुळे हजारो विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना आत जाण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागला.

​मनसे आक्रमक; पोलिसांनी गाडी घेतली ताब्यात
या प्रकारानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) जिल्हाप्रमुख गणेश बरबडे व पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत तात्काळ रस्ता मोकळा करण्याची मागणी केली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सदर गाडी ताब्यात घेऊन ठाण्यात आणली. ​पोलीस निरीक्षक भूषण गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक (PSI) प्रवीण श्रीराम मोरे हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम २८५ व १२६(२) अन्वये अपराध क्रमांक ०७७५/२०२६ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

​जागा मालकीची असल्याचा शरद भाला यांचा दावा
दुसरीकडे, शरद भाला यांनी ही ३२४ स्क्वेअर फूट (१८x१८ फूट) जागा आपली स्वतःची मालकीची असल्याचे म्हटले आहे. २८ ऑगस्ट २०२३ रोजी ही जागा प्रवीण अशोक परराव यांना विकल्याचे स्पष्ट करत त्यांनी १९९६ ची सरकारी मोजणी व १९९८ च्या कोर्ट ले-आऊट मोजणीचा संदर्भ दिला आहे.
​
तहसीलदारांच्या आदेशात काय म्हटले आहे?
या प्रकरणी तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी चिखली यांच्या कोर्टाचा आदेशही समोर आला आहे. तहसीलदारांच्या निष्कर्षानुसार:
​नगर विकास आराखड्यात नझूल प्लॉट क्र. १८०५ च्या पश्चिम दिशेस रस्ता दर्शवण्यात आला आहे.
​मंजूर ले-आऊटनुसार हा सामायिक रस्ता असून, जि. प. हायस्कूल व आयटीआय स्थापन झाल्यापासून हाच त्यांचा पारंपरिक वहिवाटीचा रस्ता असल्याचे स्पष्ट झाले आहे.
​विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून, नगर परिषद चिखली यांनी ही खरेदी रद्द करण्यासाठी दिवाणी न्यायालयात दाद मागावी व खरेदी-विक्री करणाऱ्यांना समज द्यावी, असे निर्देश तहसीलदारांनी दिले आहेत.
​
शहरात संतापाची लाट
जवळपास १०० वर्षांपासून वापरात असलेला सामायिक रस्ता अचानक अशा प्रकारे बंद केल्याने नागरिक, पालक आणि विद्यार्थ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. आता या प्रकरणी पोलीस आणि महसूल प्रशासन पुढे काय कारवाई करते, याकडे संपूर्ण चिखली शहराचे लक्ष लागले आहे.

टैग्स: ITIZP school Dispute