केंद्रीय-राज्यस्तरीय मानांकन मिळालेल्या केंद्रांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार सन्मान
हिंगोली (Hingoli Health Institution) : स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून हिंगोली जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेला मोठा मान मिळाला आहे. राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन कार्यक्रम अर्थात NQAS अंतर्गत उत्कृष्ट आरोग्य सेवा आणि सुविधा पुरवून केंद्रीय व राज्यस्तरीय नामांकन मिळवणाऱ्या जिल्ह्यातील १० आरोग्य संस्थांचा १५ ऑगस्ट २०२६ रोजी स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य शासकीय ध्वजरोहण समारंभात मा. पालकमंत्री यांच्या शुभहस्ते विशेष प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम, दर्जेदार आणि लोकाभिमुख करण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली NQAS कार्यक्रमाची यशस्वी अंमलबजावणी करण्यात आली. या अंतर्गत रुग्णालयांची स्वच्छता, वैद्यकीय उपकरणांची उपलब्धता, औषध पुरवठा, रुग्णांशी साधला जाणारा संवाद आणि रुग्ण सुरक्षेचे कडक निकष पार करून जिल्ह्यातील १० आरोग्य संस्थांनी हे मानाचे प्रमाणीकरण मिळवले आहे.
या (Hingoli Health Institution) यादीत प्राथमिक आरोग्य केंद्र मसोड ता. कळमनुरी ८४.९७ टक्के गुणांसह, प्राथमिक आरोग्य केंद्र डोंगरकडा ता. कळमनुरी ८४.६४ टक्के, प्राथमिक आरोग्य केंद्र फाळेगाव ता. हिंगोली ८४.५९ टक्के, प्राथमिक आरोग्य केंद्र पांगराशिंदे ता. वसमत ८२.३६ टक्के, प्राथमिक आरोग्य केंद्र गोरेगाव ता. सेनगाव ७८.९३ टक्के आणि प्राथमिक आरोग्य केंद्र पोत्रा ता. कळमनुरी ७२.६ टक्के अशा सहा प्राथमिक आरोग्य केंद्रांचा समावेश आहे. तसेच आरोग्य वर्धिनी उपकेंद्र सोमठाणा ता. वसमतने ९३.०१ टक्के गुण मिळवून सर्वाधिक गुण पटकावले आहेत. आरोग्य वर्धिनी उपकेंद्र बासंबा ता. हिंगोली आणि आरोग्य वर्धिनी उपकेंद्र पेडगाव ता. हिंगोली या दोन्ही उपकेंद्रांना प्रत्येकी ८२.६२ टक्के गुण मिळाले आहेत. महिला रुग्णालय वसमतला ७४.० टक्के गुणांसह या सन्मानासाठी निवड करण्यात आली आहे.
स्वातंत्र्य दिनी होणाऱ्या या विशेष सन्मानामुळे या सर्व १० आरोग्य केंद्रांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या यशामुळे जिल्ह्यातील इतर आरोग्य केंद्रांनाही अधिक दर्जेदार सेवा देण्यासाठी प्रेरणा मिळेल, असा विश्वास जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांनी व्यक्त केला आहे.