माहूर/ नांदेड (Gundval Deputy Sarpanch) : मौजे गुंडवळ येथील ग्रामपंचायतीचे उपसरपंच यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला अविश्वास ठराव दि. ६ तहसीलदार तथा निवडणूक अधिकारी अभिजित जगताप यांच्या उपस्थितीत झालेल्या विशेष सभेत हात उंचावून मतदान घेण्यात आले. यामध्ये अविश्वास ठरावाच्या बाजूने ६, तर विरोधात २ मते पडल्याने असा ठराव मंजूर झाला.
गुडवळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच राहुल कांबळे (Gundval Deputy Sarpanch) हे ग्रामपंचायत कार्यालयात मनमानी कारभार करीत असून, ग्रामपंचायतीच्या सदस्यांना विश्वासात घेत नाहीत, तसेच सरपंच निर्णय घेत असताना त्यांच्या कार्यात अडथळा निर्माण करतात, असा आरोप अविश्वास प्रस्ताव दाखल करणाऱ्या सदस्यांनी केला आहे. याशिवाय ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारांमध्ये व विकासकामांमध्ये हस्तक्षेप करून पदाचा गैरवापर केल्याचेही नमूद करण्यात आले होते.
अशा विविध कारणांवरून ग्रामपंचायतीच्या ६ सदस्यांनी दि. ३० सप्टेंबर रोजी तहसीलदार अभिजित जगताप यांच्याकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता त्या अनुषंगाने मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मधील कलम ३५ (१) नुसार उपसरपंच राहुल कांबळे यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या अविश्वास प्रस्तावावर दि.६ रोजी (Gundval Deputy Sarpanch) ग्रामपंचायत कार्यालय, गुंडवळ येथे विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी तहसीलदार तथा निवडणूक अधिकारी अभिजित जगताप, मंडळ अधिकारी व्ही. के. पाईकराव व तलाठी यादव यांच्या उपस्थितीत अविश्वास प्रस्तावावर हात उंचावून घेण्यात आलेल्या मतदानात प्रस्तावाच्या बाजूने सहा सदस्यांनी, तर विरोधात दोन सदस्यांनी मतदान केले. त्यामुळे ६ विरुद्ध २ मतांनी उपसरपंच यांच्याविरुद्धचा अविश्वास ठराव मंजूर झाला.