गोरक्षनाथ बैलजोड्या प्रदक्षिणा

छनछन घुंगरांच्या निनादात वाईत गोरक्षनाथाला हजारो बैलजोड्यांनी प्रदक्षिणा घालून घेतले दर्शन 

Gorakshanath Bail Pradakshina: शेतकऱ्यांचे श्रद्धास्थान आणि गुरांचे आराध्य दैवत असलेल्या गोरक्षनाथ महाराजांच्या पावन वाई नगरीत ‘कर’ सणानिमित्त पारंपरिक महा बैलपोळा अत्यंत उत्साहात व भक्तिमय वातावरण

छनछन घुंगरांच्या निनादात वाईत गोरक्षनाथाला हजारो बैलजोड्यांनी प्रदक्षिणा घालून घेतले दर्शन 

Gorakshanath Bail Pradakshina

 

गोरखनाथ महाराजांच्या जय..घोषाने नगरी दुमदुमली:
करीच्या महा बैलपोळ्याला हजारोंच्या संख्येने शेतकरी, भाविकाची उपस्थिती

आंबा चौंडी (Gorakshanath Bail Pradakshina) : शेतकऱ्यांचे श्रद्धास्थान आणि गुरांचे आराध्य दैवत असलेल्या गोरक्षनाथ महाराजांच्या पावन वाई नगरीत ‘कर’ सणानिमित्त पारंपरिक महा बैलपोळा अत्यंत उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी होणाऱ्या या ऐतिहासिक सोहळ्यासाठी परिसरासह दूरदूरच्या भागांतून हजारोंच्या संख्येने शेतकरी, भाविक आणि आकर्षक पद्धतीने सजविलेल्या बैलजोड्या वाईत दाखल झाल्या होत्या. वाई गोरखनाथाला हजारो बैलजोड्यांनी प्रदक्षिणा  घालत दर्शन घेतले.

बैलांच्या गळ्यातील घुंगरांचा छनछनाट आणि श्री गोरक्षनाथ महाराज की,जय,च्या जयघोषाने संपूर्ण वाई नगरी दुमदुमून गेली होती. श्रद्धा, परंपरा आणि शेतकरी संस्कृतीचा अनोखा संगम या महापोळ्याच्या निमित्ताने पाहायला मिळाला.विभूती लावण्याची जुनी परंपरा आजही चालू आहे.महापोळ्याच्या निमित्ताने शेतकऱ्यांनी आपल्या बैलजोड्यांसह गोरक्षनाथ महाराजांच्या मंदिराला प्रदक्षिणा घातली. या ठिकाणी जनावरांना विभूती लावण्याची अत्यंत जुनी परंपरा आहे. विभूती लावल्याने जनावरे निरोगी राहतात आणि रोगराईपासून त्यांचे संरक्षण होते, अशी शेतकऱ्यांची दृढ श्रद्धा आहे.

भाविकांसाठी मोफत आरोग्य तपासणी; ॲम्बुलन्ससह वैद्यकीय पथक सज्ज

‘कर’ सणानिमित्त महापोळ्यासाठी आलेल्या भाविक व शेतकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आयुष्मान आरोग्य मंदिर,  यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरात भाविकांची रक्तदाब, मधुमेह व सिकलसेल तपासणी करण्यात आली. तसेच वयोवृद्ध नागरिकांच्या आरोग्यविषयक समस्यांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. अपघातजन्य किरकोळ जखमा, ताप, सर्दी, खोकला, संसर्गजन्य आजार व जुलाब आदी समस्यांवर मोफत प्राथमिक उपचार करण्यात आले.

आपत्कालीन परिस्थिती हाताळण्या साठी ॲम्बुलन्ससह वैद्यकीय पथक घटनास्थळी सज्ज ठेवण्यात आले होते. या शिबिरात प्राथमिक आरोग्य केंद्र, पांगरा शिंदे येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. शीतल धुमाळे, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. अतुल जगताप, आरोग्य सेविका श्रीमती अरुणा गायकवाड, आरोग्य सेवक राजन राजरवाड तसेच ॲम्बुलन्स चालक गुलाब शिंदे यांनी तत्पर सेवा दिली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आरोग्य शिबिर यशस्वीरीत्या पार पडले.

मोफत लंपी लसीकरण व पशुवैद्यकीय तपासणी 

महापोळ्यासाठी आलेल्या जनावरांच्या आरोग्याच्या दृष्टीने पशुसंवर्धन विभागामार्फत मोफत लंपी लसीकरण, इतर रोगराई प्रतिबंधक लसीकरण तसेच पशुवैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी डॉ. अजय मुस्तरे, डॉ. सिद्धार्थ इंगोले, डॉ. बिरादार, डॉ. अकोष राठोड, डॉ. गोडबोले, डॉ. कांबळे, डॉ. अंजनवाड, डॉ. बिमरतीवर, श्रीमती थोरात व श्रीमती पोफळकर यांनी जनावरांची तपासणी व आवश्यक सेवा दिली. यावेळी गटविकास अधिकारी तोटावाड  यांचीही उपस्थिती होती.

चोख पोलीस बंदोबस्त; वाहतुकीत बदल

महापोळ्यासाठी होणारी मोठी गर्दी लक्षात घेऊन नागेशवाडी फाटा ते जिंतूर टी-पॉईंट हा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. हिंगोलीचे पोलीस अधीक्षक डॉ. श्रेणिक लोंढा यांच्या मार्गदर्शनाखाली कुरुंदा पोलीस ठाण्याचे ठाणेदार महादेव पुरी यांच्या नेतृत्वात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दंगा नियंत्रण पथकासह पोलीस कर्मचारी ठिकठिकाणी सज्ज ठेवण्यात आले होते. त्यामुळे हजारोंची गर्दी असूनही महापोळा शिस्तबद्ध व शांततेत पार पडला.

मंदिर संस्थान व ग्रामस्थांचा पुढाकार; महाप्रसादाचे आयोजन महापोळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी गोरक्षनाथ मंदिर संस्थानचे अध्यक्ष, सचिव, विश्वस्त, ग्रामस्थ आणि गावातील तरुणांनी विशेष परिश्रम घेतले. पोळ्यापूर्वी व पोळ्यानंतर परिसराची स्वच्छता राखण्यावरही विशेष भर देण्यात आला. मंदिर संस्थानच्या वतीने महापोळ्यासाठी आलेल्या सर्व भाविक व शेतकऱ्यांसाठी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

भाविकांसाठी मोफत चहाची व्यवस्था

दरवर्षीप्रमाणे यंदाही आंबा व चोंडी सर्कलचे सामाजिक कार्यकर्ते सत्यनारायण बोखारे पाटील यांच्या वतीने महापोळ्यासाठी आलेल्या भाविक व भक्तांसाठी मोफत चहाची व्यवस्था करण्यात आली होती. गेल्या अनेक वर्षांपासून ते या ठिकाणी भाविकांसाठी ही सेवा सातत्याने देत आहेत. त्यांच्या या सामाजिक व सेवाभावी उपक्रमाची भाविकांनी प्रशंसा केली. यावेळी भाविक तसेच संबंधित संस्थांच्या वतीने सत्यनारायण बोखारे पाटील यांचे अभिनंदन व सत्कार करण्यात आला.

श्रद्धा, संस्कृती, परंपरा आणि शेतकरी जीवनाचा अनोखा संगम घडविणारा वाई येथील गोरक्षनाथ महाराजांचा पारंपरिक महा बैलपोळा यंदाही उत्साहपूर्ण, भक्तिमय आणि शिस्तबद्ध वातावरणात संपन्न झाला.