औसा : दुष्काळ पाहणीसाठी जिल्हा दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपल्या व्यथा आणि मागण्या सांगण्यासाठी ३ ते ४ तास भर उन्हात वाट पाहणाऱ्या तावशी (ताड) येथील शेतकऱ्यांचा मुख्यमंत्र्यांच्या भेटीअभावी मोठा हिरमोड झाला. मुख्यमंत्री सुसाट वेगाने निघून गेल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बुधवारी दुष्काळ पाहणीसाठी लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. औसा तालुक्यातील खरोसा येथे शेतकऱ्यांची भेट घेऊन दुष्काळी परिस्थितीची पाहणी केल्यानंतर ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ मार्गे पुढील पाहणीसाठी धाराशिव जिल्ह्याकडे रवाना झाले.

मुख्यमंत्री या मार्गाने जाणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर तावशी (ताड) येथील शेकडो शेतकरी सकाळपासूनच महामार्गालगतच्या फाट्यावर त्यांच्या भेटीसाठी थांबले होते. सध्या गावात छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे-पाटील हे दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी मागील तीन दिवसांपासून आमरण उपोषण करत आहेत.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री गावात येऊन उपोषणकर्त्यांची भेट घेतील किंवा किमान रस्त्यावर थांबलेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र मुख्यमंत्री वाहनांचा ताफा न थांबवताच पुढे निघून गेल्याने शेतकऱ्यांची अपेक्षा फोल ठरली.
“आपल्या अडचणी थेट मुख्यमंत्र्यांसमोर मांडता येतील,” या आशेने तासन्तास उन्हात थांबलेल्या शेतकऱ्यांना अखेर मुख्यमंत्र्यांची भेट न घेताच परतावे लागले. त्यामुळे तावशी परिसरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त झाली. मुख्यमंत्र्यांनी भेट घेतली नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी रास्ता रोको करत करपलेल्या पिकांची होळी केली.
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या शासनाने गांभीर्याने ऐकून घ्याव्यात, अशी मागणी होत आहे. ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी गोंधळ निर्माण करू नये म्हणून या ठिकाणी मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता.