१६०० उमेदवारांची कागदपत्रे तपासणीसाठी प्रक्रिया ५ सप्टेंबरपर्यंत
हिंगोली ( Teacher Recruitment) : शासकीय आश्रमशाळांमधील पेसा व नॉन-पेसा क्षेत्रातील शिक्षक संवर्गातील रिक्त पदांची भरती प्रक्रिया वेगाने सुरू आहे. शिक्षण आयुक्तालयाकडून पात्र उमेदवारांची यादी प्राप्त झाली आहे. त्यांच्या शैक्षणिक व व्यावसायिक कागदपत्र पडताळणीचे सविस्तर वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. संबंधित उमेदवारांनी निर्धारित ठिकाणी, दिनांक व वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त लीना बनसोड यांनी केले आहे.
आदिवासी विकास विभागांतर्गत शासकीय आश्रमशाळांमधील शिक्षक संवर्गाच्या भरतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी गुरुवारपासून सुरू झाली आहे. शिक्षण आयुक्तालयाकडून एक हजार ६०० पात्र उमेदवारांची यादी प्राप्त झाली आहे. नाशिक, ठाणे, अमरावती आणि नागपूर येथील अपर आयुक्त कार्यालयांमार्फत ही प्रक्रिया ५ सप्टेंबरपर्यंत राबविण्यात येणार असल्याचेही बनसोड यांनी सांगितले. पेसा आणि नॉन-पेसा क्षेत्रातील शासकीय आश्रम शाळांमधील शिक्षकांच्या एकूण दोन हजार ४२१ रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. पवित्र पोर्टलमार्फत शिफारस करण्यात आलेल्या उमेदवारांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेची कागदपत्रे तपासण्यात येत आहेत.
प्राप्त उमेदवारांच्या यादीत (Teacher Recruitment) प्राथमिक शिक्षकांचे ९२७, माध्यमिक शिक्षकांचे ४२१ आणि उच्च माध्यमिक शिक्षकांचे २५२ उमेदवार आहेत. त्यापैकी पेसा क्षेत्रातील ४५९, तर नॉन-पेसा क्षेत्रातील एक हजार १४१ उमेदवारांचा समावेश आहे. नाशिक विभागात सर्वाधिक ५८८ उमेदवारांची कागदपत्र पडताळणी होत आहे. ठाणे विभागात ४२४, नागपूर विभागात २९६ आणि अमरावती विभागात २९२ उमेदवारांचा समावेश आहे. कागदपत्र पडताळणीसाठी संबंधित उमेदवारांनी पवित्र पोर्टलवर नोंदविलेल्या दाव्यांच्या पुष्ट्यर्थ आवश्यक सर्व मूळ प्रमाणपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
तसेच जाहिरातीनुसार आवश्यक असलेली कागदपत्रे आणि प्रत्येक कागदपत्राची स्वसाक्षांकित छायांकित प्रत सोबत आणणे बंधनकारक आहे. निर्धारित दिनांक, वेळ आणि ठिकाणी उपस्थित न राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील. पात्र उमेदवारांची सविस्तर यादी आणि कागदपत्र पडताळणीचे वेळापत्रक विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचेही आदिवासी विकास विभागाने कळवले आहे.