दोन सिलिंडर वेळीच बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला
देवळी (Deoli fridge compressor explosion) : देवळी शहरातील नगरपरिषद लेआउट परिसरात फ्रिजच्या कॉम्प्रेसरचा स्फोट होऊन घराला भीषण आग लागली. बुधवारी दुपारी २ ते २.३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने घरात कोणीही नसल्याने जीवितहानी टळली. मात्र, आगीत घरातील साहित्य जळून खाक झाले असून सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. नगरपरिषद लेआउटमधील पांडुरंग लेंडे यांच्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर सचिन वैद्य हे भाड्याने राहतात. घरातून धुराचे लोट बाहेर येत असल्याचे घरमालकाच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने देवळी नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाला माहिती दिली.
अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. घराला कुलूप असल्याने घरमालकाने कुलूप तोडल्यानंतर जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यास सुरुवात केली. फ्रिजच्या कॉम्प्रेसरचा स्फोट झालेल्या ठिकाणीच दोन गॅस सिलिंडर ठेवले होते. आग वेगाने पसरत असताना जवानांनी प्रसंगावधान राखत दोन्ही सिलिंडर तातडीने घराबाहेर काढले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
या (Deoli fridge compressor explosion) आगीत कपाट, गाद्या, दिवाण, दरवाजे, पंखे, कपडे यासह घरातील गृहपयोगी साहित्य जळून खाक झाले. अलमारीत ठेवलेले सोनेही आगीत जळाल्याचे सचिन वैद्य यांनी सांगितले. या घटनेत जवळपास तीन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाचे कर्मचारी अभिषेक काळे, अकील फारुखी आणि आसिफ शेख यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या तत्परतेमुळे आग अधिक पसरण्यापासून रोखण्यात यश आले.