चिखली येथील डॉ. युवराज शिरसाट यांच्या घरी 'दूध - पोषण की विष?' थीमवर अनोखे गणेश विसर्जन
चिखली (Chikhali Ganesha immersion) : शाहूनगर, चिखली येथील रहिवासी डॉ. युवराज शिरसाट यांच्या परिवाराने यावर्षी गणेशोत्सवात पर्यावरणपूरकतेसोबतच आरोग्यविषयक अत्यंत महत्त्वाच्या विषयावर जनजागृती करत एका अनोख्या आणि स्तुत्य उपक्रमाचे आयोजन केले होते.
'दूध - पोषण की विष?' या महत्त्वाच्या थीमवर गणेश मूर्तीची स्थापना
डॉ. शिरसाट परिवाराने यावर्षी "दूध - पोषण की विष?" या मुख्य संकल्पनेवर (थीमवर) आधारित श्री गणेशाची स्थापना केली होती. या सजावटीच्या व देखाव्याच्या माध्यमातून त्यांनी भेसळयुक्त दुधाचे मानवी आरोग्यावर होणारे घातक परिणाम आणि गावाकडचे शुद्ध, नैसर्गिक दूध याचे महत्त्व अधोरेखित केले. समाजाला भेसळमुक्त दुधाविषयी व आरोग्याविषयी जागरूक करण्याचा आणि बाप्पाकडे सर्वांना "सदबुद्धी दे, माणुसकी शिकव" अशी प्रार्थना करण्याचा एक अतिशय सुंदर व प्रबोधनात्मक प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला होता.
अनोखे आणि पर्यावरणपूरक चॉकलेट विसर्जन
गणेशोत्सवाच्या सांगतेला, डॉ. शिरसाट परिवाराने फुड ग्रेड (Food Grade) चॉकलेटपासून बनवलेल्या श्री गणेशाच्या मूर्तीचे अत्यंत नाविन्यपूर्ण पद्धतीने विसर्जन केले. मूर्तीचे पारंपरिक पद्धतीने पाण्यात विसर्जन न करता, सुमारे १० लिटर दुधात चॉकलेटच्या मूर्तीवर दुधाचा श्लोक व अभिषेकासह विसर्जन करण्यात आले. काही वेळातच ही चॉकलेटची मूर्ती दुधात पूर्णपणे विरघळली आणि त्यापासून घट्ट व चवदार 'चॉकलेट मिल्क शेक' तयार झाला.

अनाथ आश्रमातील ७० मुलांना चॉकलेट मिल्क शेकचा प्रसाद!
तयार झालेला हा चॉकलेट मिल्क शेक शिरसाट परिवाराने प्रथम प्रसाद म्हणून ग्रहण केला. यानंतर, (Chikhali Ganesha immersion) चिखली जवळील हिवरा आश्रम येथील 'नित्यानंद अनाथ आश्रम' मधील जवळपास ७० लहान मुलांना हा पौष्टिक चॉकलेट मिल्क शेक प्रसाद म्हणून वाटण्यात आला. आश्रमातील बालकांनी अत्यंत आनंदाने या प्रसादाचा आस्वाद घेतला.
जलप्रदूषण टाळत अन्नाचा अपव्यय रोखला
या (Chikhali Ganesha immersion) संकल्पनेतून डॉ. युवराज शिरसाट आणि त्यांच्या परिवाराने केवळ जलप्रदूषण टाळण्याचेच नव्हे, तर अन्नाचा अपव्यय टाळून गरजूंना प्रसाद देण्याचा एक उत्कृष्ट आणि आदर्शात्मक संदेश समाजाला दिला आहे. डॉ. शिरसाट परिवाराच्या या सामाजिक भान जपणाऱ्या आणि आरोग्यदायी देखाव्यासह पार पडलेल्या पर्यावरणपूरक उपक्रमाचे संपूर्ण परिसरातून मोठे कौतुक होत आहे.