नगराध्यक्ष सुमित मेंढे सह सर्व पदाधिकाऱ्यांनी केली पाणीपुरवठा योजनेची पाहणी
नागपूर (Butibori Pure Water Yojana) : बुटीबोरी शहर आणि परिसरातील नागरिकांची अनेक वर्षांची पिण्याच्या पाण्याची समस्या आता कायमची निकाली निघणार आहे. सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान अंतर्गत बुटीबोरीसाठी तब्बल ११३ कोटी रुपयांच्या भव्य पाणीपुरवठा योजने अंतर्गत सुरु असलेले काम आता अंतिम टप्प्यात असून बुटीबोरी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष सुमित मेंढे, उपाध्यक्ष व बांधकाम सभापती आकाशदादा वानखेडे पाणीपुरवठा व मलनीस्सारान सभापती मंदार वानखेडे, अभियंता अभय गुताल सह सर्व नगरसेवक व नगरसेविकांनी या महत्त्वाकांक्षी योजनेची शुक्रवार दि १० जुलै ला पाहणी केली. या पाणीपुरवठा योजनेमुळे बुटीबोरीवासीयांना आता रोज शुद्ध आणि मुबलक पाणी मिळणार असल्याची माहिती पाणीपुरवठा सभापती मंदार वानखेडे यांनी दिली.
बुटीबोरी शहराची वाढती लोकसंख्या आणि औद्योगिक विस्तार लक्षात घेता सध्याची पाणीपुरवठा यंत्रणा अपुरी पडत होती. ही अडचण दूर करण्यासाठी या नव्या योजनेची आखणी करण्यात आली आहे. या योजनेचा मुख्य स्त्रोत 'रामा डॅम' हा असणार आहे. रामा धरणावरून बुटीबोरी शहरापर्यंत तब्बल २० किलोमीटर लांबीची मुख्य जलवाहिनी (पाईपलाईन) टाकण्यात आली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ही पाईपलाईन टाकली असल्याने पाण्याचा अपव्यय टळणार असून, थेट धरणाचे शुद्ध पाणी शहरात पोहोचवणे शक्य होणार आहे.
शहराच्या कानाकोपऱ्यात आणि नव्याने विकसित झालेल्या वस्त्यांमध्ये समप्रमाणात व योग्य दाबाने पाणीपुरवठा व्हावा, यासाठी शहरात वेगवेगळ्या ६ मोक्याच्या ठिकाणी ६ नवीन उच्चस्तरीय पाण्याच्या टाक्या उभारल्या असून या टाक्यांमुळे जलवाहिन्यांवरील ताण कमी होईल आणि शेवटच्या घरापर्यंत पूर्ण दाबाने पाणी पोहोचू शकेल. जुन्या टाक्यांसोबतच या नवीन ६ टाक्या कार्यान्वित झाल्यामुळे पाणी साठवणूक आणि वितरण व्यवस्था अधिक मजबूत होणार आहे.
योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये एका नजरेत
एकूण बजेट: ₹११३ कोटी रुपये
अभियान: सुवर्ण जयंती नगरोत्थान पाणीपुरवठा योजना
मुख्य स्त्रोत: रामा धरण
पाईपलाईन लांबी: २० किलोमीटर
नवीन पायाभूत सुविधा: ६ अत्याधुनिक पाण्याच्या टाक्या
ही महत्वाकांशी योजना मंजूर करून आणण्यासाठी पाणीपुरवठा व मल निस्सारन सभापती मंदार वानखेडे यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. बुटीबोरी हा नागपूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचा औद्योगिक आणि निवासी पट्टा आहे. मात्र, येथील नागरिकांना उन्हाळ्यात आणि इतर ऋतूंमध्येही पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. "बुटीबोरीच्या नागरिकांना शुद्ध पाणी मिळणे हा त्यांचा हक्क आहे. ११३ कोटींची ही योजना बुटीबोरीच्या विकासात मैलाचा दगड ठरेल आणि नागरिकांना आता पाण्यासाठी भटकंती करावी लागणार नाही," असा विश्वास मंदार वानखेडे यांनी व्यक्त केला.
या योजनेमुळे केवळ पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार नसून शहराच्या आरोग्याचा दर्जाही सुधारणार आहे. शुद्ध पाण्याचा पुरवठा नियमित होणार असल्याने जलजन्य आजारांना आळा बसेल. या ऐतिहासिक विकासकामाबद्दल बुटीबोरीतील महिला वर्ग आणि स्थानिक नागरिकांनी मंदार वानखेडे व प्रशासनाचे विशेष आभार मानले आहेत. आगामी काही दिवसांतच या योजनेच्या माध्यमातून शहरला पाणीपुरवठा सुरु होणार असून, हे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.