पाच दिवस झाले तरी उपोषणाची दखल नाही
शासन व प्रशासन विरोधात बंजारा समाज आक्रमक
मानोरा (Banjara Samaj ST Reservation) : बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्याच्या मागणीसाठी तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथे पाच दिवसा पासून बेमुदत आमरण उपोषण सुरू आहे. दिनांक १७ सप्टेंबर रोजी उपोषणाचा पाचवा दिवस होता. उपोषणकर्ते यांची प्रकृती खालावली असून उपोषणकर्ते श्रीकांत राठोड, सतीश पवार यांच्या रक्तातील साखर व रक्तदाब कमी झाली आहे. वैद्यकीय पथकाने रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला आहे, मात्र उपोषणकर्ते आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. आंदोलनाला पाच दिवस उलटले तरी शासनाच्या कोणत्याही लोकप्रतिनिधींनी तथा प्रशासनाचे अधिकारी तहसीलदार व्यतिरिक्त कोणत्याही अधिकाऱ्यांनी भेट देऊन तरीही दखल घेतलेली नाही. त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्रभर आंदोलन सुरू करण्यात येईल. अशी माहिती पत्रकार परिषदेत जय मरियामा,जय सेवाभाया, संत रामराव बापू चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव विजय माळवे (मुंबई) यांनी दिली.
पत्रकार परिषदेत माहिती देताना ॲड सिंपलताई राठोड यांनी सांगितले की, संतनगरी काशी पोहरादेवीत आजपर्यंत एकाही समाजाचे नेते, पुढाऱ्यांनी भेट दिलेली नाही. हा आंदोलन बंजारा समाजाला एसटी आरक्षणाचा न्याय मिळण्यासाठी राज्यातील विविध जिल्ह्यातील युवकांनी लढा सुरू केलेला आहे. त्यामुळे न्याय मिळेपर्यंत ही लढाई सुरूच राहील, तसेच समाज बांधवांनी संत नगरीत हजेरी लावत उपोषणाला जाहीर पाठींबा द्यावा, असे आवाहन करत मत व्यक्त केले. पत्रकार परिषदेला गोकुळ चव्हाण पुसद, माजी जी प सदस्य मोहन जाधव यवतमाळ, मोहिनी महेश राठोड यवतमाळ, प्रवीण चव्हाण मुंबई, राजेश राठोड बुलढाणा, सीताराम राठोड नांदेड आदी उपस्थित होते.