मानोरा : तालुक्यातील तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथे १३ सप्टेंबरपासून राज्यातील बंजारा समाजातील आठ युवकांनी एसटी प्रवर्गाचे प्रलंबित आरक्षण मिळावे, यासाठी सुरू केलेले बेमुदत सामूहिक उपोषण आंदोलन आठव्या दिवशी शासनाचे पत्र दिल्याने दि. २० सप्टेंबर २०२६ रोजी आंदोलनकर्त्यांनी तूर्तास स्थगित केले आहे.
आंध्र व तेलंगणा राज्यांमध्ये एसटी प्रवर्गाचे संवैधानिक आरक्षण प्राप्त असलेल्या बंजारा समाजाला महाराष्ट्रातही त्याच धर्तीवर समान आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीसाठी विदर्भ आणि मराठवाड्यातील आठ युवकांनी तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथे सामूहिक उपोषणाला सुरुवात केली होती.
या समाजाचा अनुसूचित जमाती या केंद्र सरकारच्या अनुसूचित यादीत समावेश करण्यासाठी राज्य शासनाने उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती एम. एल. टहलियानी यांची समिती स्थापन केली असून, न्यायमूर्ती टहलियानी समितीकडून तीन महिन्यांत या समाजाच्या मागणीचा तपास करण्याच्या दृष्टीने अभ्यास करून अहवाल सादर करण्याचे निश्चित करण्यात आले होते.
न्या. टहलियानी समितीने आपला अभ्यास १ जूनपासून सुरू केला असून, या समाजाच्या अभ्यासाचे स्वरूप व्यापक असल्याने शासनाने या समितीला अहवाल सादर करण्यासाठी तीन महिन्यांचा वाढीव कार्यकाळ दिल्याचे पत्र पोहरादेवी येथे उपोषण करणाऱ्या युवकांच्या निदर्शनास प्रशासनाच्यावतीने आणून देण्यात आले. त्यानंतर उपोषणार्थींनी तूर्तास आपले उपोषण स्थगित केले आहे.
यावेळी शासनाचे प्रतिनिधी आ. बाबूसिंग महाराज राठोड यांच्या व नायब तहसीलदार बनसोड यांच्या हस्ते लिंबू पाणी पाजून उपोषणकर्त्यांचे उपोषण सोडविण्यात आले. यावेळी महंत मंडळी व समाजबांधव उपस्थित होते.