तिसऱ्याही दिवशी आंदोलन सुरूच; समितीच्या प्रगती अहवालावर प्रश्नचिन्ह?
मानोरा : बंजारा समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गात समाविष्ट करून संवैधानिक आरक्षण द्यावे, या मागणीसाठी सकल बंजारा समाजाच्या वतीने पोहरादेवी येथे १३ सप्टेंबरपासून ९ बंजारा बांधवांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. मंगळवारी उपोषणाचा तिसरा दिवस असून आंदोलन सुरूच होते.
बंजारा समाजाच्या एसटी आरक्षणाच्या मागणीचा अभ्यास करण्यासाठी शासनाने २७ फेब्रुवारी २०२६ रोजी समिती स्थापन केली होती. मात्र, समितीने आतापर्यंत केलेला अभ्यास, घेतलेल्या बैठका तसेच अहवालाची सद्य:स्थिती याबाबत समाजाला स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही, असा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे समितीने केलेल्या कामाचा सविस्तर प्रगती अहवाल तातडीने सार्वजनिक करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
एसटी आरक्षणाचा अंतिम निर्णय होईपर्यंत बंजारा समाजाला एसटी प्रवर्गाच्या धर्तीवर शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक सवलती द्याव्यात, समितीचा अहवाल तातडीने पूर्ण करून केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवावा, तसेच तेलंगणा व आंध्र प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातील बंजारा समाजाला एसटी आरक्षण द्यावे, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
या मागणीसाठी संजय महाराज (पोहरादेवी), सतीश पवार (बीड), श्रीकांत राठोड (जालना), अंकुश राठोड (बुलढाणा), दिनकर राठोड (पुसद), सुरेश राठोड (हिंगोली), रमेश ऊर्फ सोम पवार (उमरी खुर्द), नामदेव राठोड (औंढा नागनाथ) आणि जयसिंग राठोड (आर्णी) यांचा या उपोषणात समावेश आहे.
बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या पोहरादेवी येथे हे आंदोलन सुरू झाल्याने या मागणीला पुन्हा एकदा जोर धरला आहे. समितीचा प्रगती अहवाल कधी जाहीर होणार आणि एसटी आरक्षणाबाबत शासनाची पुढील भूमिका काय असेल, याकडे संपूर्ण भारत देशातील बंजारा समाजाचे लक्ष लागले आहे.