अनोखे आंदोलनाने वेधले संपूर्ण जिल्हा वाशीयांचे लक्ष
शासन, प्रशासनाविरोधात शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष
मानोरा (Bail Pola Protest March) : मानोरा तालुक्यात मागील महिनाभरापासून पावसाचा मोठ्या प्रमाणात खंड पडलेला आहे. त्यामुळे तालुक्यातील सोयाबीन, कापूस, तूर, उडीद तसेच इतर खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्यांना गंभीर आर्थिक फटका बसला आहे. पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली असून अनेक ठिकाणी पिके वाळण्याच्या स्थितीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर परिवर्तन शेतकरी संघटना व शेतकरी नेते मनोहर राठोड यांच्या नेतृत्वात दि. १० सप्टेंबर रोजी बैल पोळा साजरा करून विविध मागण्यांचे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, मानोरा तालुका सरसकट दुष्काळग्रस्त जाहीर करावा, शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे तात्काळ पंचनामे व सर्वेक्षण करावे, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी एक लाख रुपये अनुदान मंजूर करावे. शासनाचे व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी (Bail Pola Protest March) मानोरा येथे पोळ्याच्या दिवशी 'शेतकऱ्यांचा पोळा मोर्चा' आयोजित करण्यात आला होता. "शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय संघर्ष सुरूच राहील" असा निर्धार यावेळी करण्यात आला. तरी सदर मोर्चाची दखल घेऊन शेतकऱ्यांच्या मागण्यांवर तात्काळ सकारात्मक कार्यवाही करावी व शेतीपिकाचे सर्वेक्षण करून योग्य ती नुकसानभरपाई व अनुदान मिळवून द्यावे, अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली.
बैलपोळा मोर्चा आंदोलनात (Bail Pola Protest March) शेतकरी नेते मनोहर राठोड, संजय महाराज, प्रकाश राठोड, गोपाल चव्हाण, यांच्यासह शेतकरी निलेश पाटील, रामराव चव्हाण, विजय राठोड, करिनाताई आडे, प्रवीण राऊत, एकनाथ खोडके, पंडीत राठोड, दामोदर राठोड, धनराज राठोड, पवन राठोड, युवराज राठोड, भाऊराव चव्हाण श्याम जाधव, शंकर जाधव, विनोद राठोड, प्रल्हाद राठोड, पृथ्वीराज चव्हाण, प्रशांत ठाकरे, गोपीचंद चव्हाण, अजय वाळके, अनिल नागोलकर, रामकृष्ण काळेकर, किशोर डहाके, श्रीकांत इंगोले, धनराज पेटकर, संजय घोडे, मनोहर शामसुंदर व महिला शेतकऱ्याची उपस्थिती होती.