गर्भगृहातील दुरुस्तीच्या कामासाठी ५ ऑक्टोबरपासून मंदिर बंद
हिंगोली (Aundha Nagnath Temple closed) : औंढा नागनाथ येथील श्री नागनाथ मंदिराच्या परिसरातील आतील गर्भगृहातील दुरुस्तीचे काम सहायक संचालक, पुरातत्व विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. मंदिर परिसरात भाविक व पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने दुरुस्तीचे काम सुरक्षित व सुरळीतपणे पूर्ण करण्यासाठी ०५ ऑक्टोबर २०२६ पासून मंदिर भाविकांसाठी एक महिन्याच्या कालावधीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती श्री नागनाथ संस्थान, औंढा नागनाथचे अध्यक्ष तथा तहसीलदार हरीश गाडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
गर्भगृहातील दुरुस्तीचे काम दिवसभर सुरू ठेवणे आवश्यक असल्याने भाविक व पर्यटकांना मंदिरात प्रवेश देता येणार नाही. त्यामुळे भाविकांनी या कालावधीत (Aundha Nagnath Temple closed) मंदिर बंद असल्याची नोंद घेऊन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही श्री नागनाथ संस्थान, औंढा नागनाथ यांच्यावतीने गाडे यांनी केले आहे.
दरम्यान, मंदिर भाविकांसाठी बंद असले तरी श्रींचे नित्य धार्मिक विधी व दैनंदिन कार्यक्रम नियमानुसार सुरू राहणार आहेत. सकाळची पूजा, दुपारी १२ वाजता महानैवेद्य आरती, दुपारी ४ वाजता श्रींचे स्नान तसेच रात्रीची शेज आरती गर्भगृहातील भोपी, माळी, गुरव, कोळी व पुजारी यांच्या हस्ते नित्यनियमाने करण्यात येणार आहे, असेही त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.