मंगरूळ नवघरे ग्रामस्थांनी केला ठाणेदार जयसिंग राजपूत व पथकाचा नागरी सत्कार
चिखली (Amdapur Police Action) : चिखली तालुक्यातील अमडापूर येथील अमर विद्यालयात इयत्ता नववीत शिक्षण घेणारा कुंदन अमोल आंभोरे हा १४ वर्षीय विद्यार्थी अचानक बेपत्ता झाल्याची खळबळजनक घटना घडली होती. दोन दिवसांपासून मुलगा गायब असल्याने आंभोरे कुटुंब अत्यंत चिंतातुर झाले होते. कुंदनचे वडील अमोल शिवाजी आंभोरे यांनी याप्रकरणी अमडापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
घटना अत्यंत संवेदनशील असल्याने (Amdapur Police Action) अमडापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार जयसिंग राजपूत यांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तात्काळ तपासाचे चक्रे फिरवली आणि विशेष पोलीस पथक स्थापन करून शोधाशोध सुरू केली.
मोबाईल लोकेशनच्या आधारे शेगाव रेल्वे स्थानकावर कारवाई
तपासादरम्यान तंत्रज्ञान आणि मोबाईल ट्रॅकिंगचा प्रभावी वापर करण्यात आला. (Amdapur Police Action) पोलिसांना तांत्रिक विश्लेषणाद्वारे कुंदनचे लोकेशन शेगाव परिसरात असल्याचे संकेत मिळाले. ठाणेदार जयसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने त्वरित शेगाव गाठले. शेगाव रेल्वे स्थानक परिसरात कसून शोध घेतला असता, कुंदन सुरक्षित अवस्थेत मिळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन आवश्यक ती सर्व कायदेशीर आणि प्रशासकीय प्रक्रिया जलद गतीने पूर्ण केली व त्याला सुरक्षितपणे त्याच्या वडिलांच्या स्वाधीन केले. मुलगा सुखरूप घरी परतल्यामुळे कुटुंबीयांचा जीव भांड्यात पडला व संपूर्ण गावात समाधानाचे वातावरण निर्माण झाले.
पोलीस ठाण्यात जाऊन फुलांचा वर्षाव व सत्कार
अमडापूर पोलिसांनी दाखवलेली तत्परता, संवेदनशीलता आणि कौशल्याचे मंगरूळ नवघरे परिसरातील नागरिकांनी व युवकांनी मनापासून कौतुक केले. या उत्तम कामगिरीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मंगरूळ नवघरे येथील ग्रामस्थ व तरुण एकत्र येऊन थेट (Amdapur Police Action) अमडापूर पोलीस ठाण्यात पोहोचले.
यावेळी ठाणेदार जयसिंग राजपूत व त्यांच्या संपूर्ण टीमचा विशाल पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन अत्यंत योग्य रीतीने सत्कार करण्यात आला. कठीण प्रसंगात पोलिसांनी अत्यंत गतीने आणि योग्य पद्धतीने प्रकरण हाताळल्याबद्दल उपस्थितांनी ठाणेदार राजपूत यांच्या नेतृत्वाचे विशेष आभार मानले.
मोठ्या संख्येने ग्रामस्थांची उपस्थिती
या सत्कार सोहळ्याला मंगरूळ नवघरे परिसरातील नागरिक व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने निखिल आंभोरे पाटील, अमोल आंभोरे, गोपाल आंभोरे, गजानन आंभोरे, ज्ञानू खपके, आकाश कोरडे, सागर सावत, बबनराव राऊत, गजानन शिरसाठ, हर्षल आंभोरे, मुकेश आंभोरे, विशाल आंभोरे, शुभम आंभोरे यांच्यासह परिसरातील इतर अनेक प्रमुख नागरिक उपस्थित होते.
पोलीस पथकाचे कौतुक
विद्यार्थ्याला सुरक्षित शोधून काढण्याच्या या यशस्वी शोधमोहिमेत ठाणेदार जयसिंग राजपूत यांच्यासोबत खुफिया विभागाचे मुन्ना ठाकूर, अमोल राजपूत, वाहनचालक संदीप वायाळ, ठाकूर तसेच रायटर मुरडकर यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. अमडापूर पोलिसांच्या या धडक व कर्तव्यदक्ष कारवाईमुळे पोलीस-नागरिक संबंध दृढ झाले असून सर्व स्तरांतून अमडापूर पोलिसांचे अभिनंदन होत आहे.