दुसऱ्या टप्प्यातील कर्ज वेळेवर फेडणाऱ्यांना संधी; UPI-Linked क्रेडिट कार्डची मर्यादा ३० हजारांपर्यंत
PM SVANidhi Scheme: देशातील छोटे व्यावसायिक आणि रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांना आर्थिक आधार देण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री स्ट्रीट वेंडर्स आत्मनिर्भर निधी (PM SVANidhi) योजना राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत पात्र फेरीवाल्यांना कोणतीही हमी न देता टप्प्याटप्प्याने कर्ज उपलब्ध करून दिले जाते. विशेष म्हणजे, ठरावीक निकष पूर्ण करणाऱ्या लाभार्थ्यांना UPI-Linked RuPay Credit Card मिळण्याचीही सुविधा आहे.
PM SVANidhi अंतर्गत फेरीवाल्यांना तीन टप्प्यांत कर्ज दिले जाते. पहिल्या टप्प्यात १५ हजार रुपयांपर्यंत, दुसऱ्या टप्प्यात २५ हजार रुपयांपर्यंत, तर तिसऱ्या टप्प्यात ५० हजार रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते.
कोणत्या फेरीवाल्यांना मिळणार क्रेडिट कार्ड?
PM SVANidhi अंतर्गत दुसऱ्या टप्प्यात घेतलेले कर्ज वेळेत फेडलेल्या आणि तिसऱ्या टप्प्यातील कर्जासाठी पात्र असलेल्या फेरीवाल्यांना UPI-Linked RuPay Credit Card मिळू शकते. तिसऱ्या टप्प्यातील कर्ज घेतलेल्या लाभार्थ्यांनाही या सुविधेचा लाभ मिळू शकतो.
या क्रेडिट कार्डची मर्यादा ३० हजार रुपयांपर्यंत असू शकते. तसेच तिसऱ्या टप्प्यातील कर्जाची पूर्ण परतफेड केलेले लाभार्थीही या सुविधेसाठी अर्ज करू शकतात.
२० ते ५० दिवसांपर्यंत क्रेडिटचा लाभ
क्रेडिट कार्डचे बिल वेळेत भरल्यास २० ते ५० दिवसांपर्यंत क्रेडिट कालावधी मिळू शकतो. याशिवाय डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी फेरीवाल्यांना किरकोळ आणि घाऊक डिजिटल व्यवहारांवर १,६०० रुपयांपर्यंत कॅशबॅक प्रोत्साहन दिले जाते.
यामुळे PM SVANidhi योजनेच्या माध्यमातून फेरीवाल्यांना व्यवसायासाठी कर्जासोबतच डिजिटल व्यवहार आणि क्रेडिट सुविधेचाही लाभ मिळू शकतो.