ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान तीन तीव्र वादळांची शक्यता
मुंबई/ वर्धा (Indian Cyclone) : मान्सूनच्या परतीनंतर उत्तर हिंद महासागरात चक्रीवादळांची सक्रियता वाढण्याची शक्यता असून, याबाबत भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO)ने सावधतेचा इशारा दिला आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत तीन तीव्र चक्रीवादळे निर्माण होण्याची शक्यता असल्याचे इस्रोच्या अभ्यासातून समोर आले आहे. इस्रोच्या संशोधकांनी मागील सुमारे चार दशकांतील समुद्र आणि वातावरणाशी संबंधित माहितीचा अभ्यास केला आहे. या अभ्यासानुसार, यंदाच्या मान्सूननंतर समुद्रातील वातावरण असामान्यपणे अस्थिर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्तर हिंद महासागरात चक्रीवादळांची निर्मिती (Indian Cyclone) होण्यास पोषक परिस्थिती निर्माण होऊ शकते.
संशोधनानुसार, यंदा निर्माण होणाऱ्या संभाव्य तीन वादळांची तीव्रता ऐतिहासिक सरासरीच्या तुलनेत अधिक असू शकते. (Indian Cyclone) समुद्रातील चक्रीवादळांच्या तीव्रतेचा अंदाज घेण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पॉवर डिसिपेशन इंडेक्स (PDI) मध्येही वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मागील 44 वर्षांच्या तुलनेत या कालावधीतील वादळांची ऊर्जा अधिक तीव्र राहण्याची शक्यता असल्याचे अभ्यासात नमूद करण्यात आले आहे.
मान्सूननंतर वाढणार समुद्री अस्थिरता
मान्सूनच्या माघारीनंतर समुद्रातील वातावरणातील बदलांमुळे वादळी परिस्थिती निर्माण (Indian Cyclone) होण्याची शक्यता आहे. जागतिक हवामान घटकांचाही इस्रोच्या शास्त्रज्ञांनी अभ्यास केला आहे. मात्र, संभाव्य चक्रीवादळे नेमकी कोणत्या दिवशी आणि कुठे धडकतील, याबाबत अद्याप स्पष्ट अंदाज देण्यात आलेला नाही. यंदा एल-निनोच्या प्रभावामुळे पावसाच्या वितरणावर परिणाम झाल्याचेही नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे काही भागांमध्ये पावसाची तूट निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर मान्सूननंतरच्या काळातील हवामानातील बदलांकडे विशेष लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
आपत्कालीन यंत्रणांना तयारीची संधी
इस्रोच्या या अभ्यासामुळे संभाव्य चक्रीवादळांचा धोका लक्षात घेऊन प्रशासनाला आधीपासून तयारी करण्यास वेळ मिळू शकतो. किनारी भागातील नागरिकांचे संरक्षण, मालमत्तेची सुरक्षा, आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवणे तसेच गरज भासल्यास समुद्रातील मासेमारीसारख्या उपक्रमांवर निर्बंध घालण्याच्या उपाययोजना करता येऊ शकतात. संभाव्य वादळांची नेमकी ठिकाणे आणि वेळ अद्याप निश्चित नसली, तरी वर्षाच्या अखेरीस उत्तर हिंद महासागरातील चक्रीवादळांची सक्रियता वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासन आणि नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक ठरणार आहे.