जिल्हाधिकाऱ्यांचा मनाई आदेश जारी
२५ ते २७ सप्टेंबर दरम्यान शस्त्र बाळगण्यास सक्त मनाई!
उल्लंघन केल्यास भारतीय न्याय संहिता २०२३ कलम २२३ नुसार कारवाई!
मानोरा (Washim Ganesh Visarjan) : वाशिम जिल्हयात दि. १४ सप्टेंबर २०२६ रोजी श्री गणेश स्थापना झाली असून २५ सप्टेंबर ते २७ सप्टेंबर २०२६ या कालावधीत सार्वजनिकरित्या मिरवणुका काढून विसर्जन करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी मोठा निर्णय घेतला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ (१) अंतर्गत मनाई आदेश जारी करण्यात आला आहे. या आदेशानुसार विसर्जन मिरवणुकीदरम्यान मिरवणुकीत वापरण्यात येणाऱ्या वाहनांवर लोखंडी तलवार, भाले, कोयते, विळे, त्रिशूल, कट्यार यांसारखी धारदार व घातक शस्त्रे लावून शक्ती प्रदर्शन करण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. त्याअनुषंगाने पोलीस अधीक्षक, वाशिम यांनी दिनांक १७ सप्टेंबर २०२६ रोजी पाठवलेल्या प्रस्तावात नमूद केले आहे की, वाशिम जिल्हा जातीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आहे. सार्वजनिक सण-उत्सव काळात इतर कारणावरून जातीय दंगली घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचा पूर्व इतिहास आहे.
गणेशोत्सव (Washim Ganesh Visarjan) काळात दाखल गुन्ह्यांचे आकडेवारीनुसार वाशिम जिल्हा सण उत्सवाच्या दृष्टीने व जातीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील असल्याचे स्पष्ट होते, तसेच जातीय दंगलीचे गुन्ह्यात सुद्धा तलवारीचा वापर करण्यात आला असल्याचे आढळून आले आहे. आगामी श्री गणेश विसर्जन दरम्यान एखादा अनुचित प्रकार घडून जातीय दंगल घडल्यास विसर्जन दरम्यान शक्ती प्रदर्शन करिता वाहनांवर लावण्यात आलेल्या घातक शस्त्रांचा उपयोग एकमेकांविरुद्ध मारक शस्त्र म्हणून निश्चित होऊ शकतो, त्यामुळे जीवित हानी होऊन कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या पार्श्वभूमीवर वाशिम जिल्हयात संपूर्ण क्षेत्रात श्री गणेश विसर्जन वाहनांवर तलवार, त्रिशूल, भाला, कोयता, विळा, दांडपट्टा, कट्यार इत्यादी धारदार घातक शस्त्र लावण्यास आणि सार्वजनिक ठिकाणी, श्री गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये प्रदर्शन करण्याबाबत मनाई आदेश पारित करण्यात आला आहे. सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती / मंडळाचे पदाधिकारी यांचेविरुद्ध पोलीस विभागाकडून भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २२३ नुसार कारवाई करण्यात येईल. हा आदेश आज दिनांक २३ सप्टेंबर २०२६ रोजी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्वाक्षरीनिशी निर्गमित केला आहे.