शेतकऱ्यांना कमी भाव, ग्राहकांना महागाईची झळ
मुंबई (Consumers Hit by Inflation) : दसरा-दिवाळीच्या सणांना अवघे काही दिवस शिल्लक असताना बाजारात कडधान्यांच्या दरवाढीने सर्वसामान्यांच्या खर्चात आणखी भर पडण्याची शक्यता आहे. सणासुदीच्या काळात गोडधोड पदार्थांसह विविध खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी डाळी, तेल, तूप आणि अन्य किराणा वस्तूंची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. मात्र, यंदा प्रमुख कडधान्यांच्या दरात वाढ झाल्याने गृहिणींचे महिन्याचे आर्थिक गणित बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
गेल्या महिनाभरात चणा, तूर, मूग आणि वाटाणे या प्रमुख कडधान्यांच्या घाऊक दरात लक्षणीय वाढ झाली आहे. (Consumers Hit by Inflation) बाजारातील आवक, मागणी आणि उपलब्ध साठा यांचा दरांवर परिणाम होत असला, तरी या दरवाढीचा अपेक्षित फायदा शेतकऱ्यांना मिळत नसल्याचे चित्र आहे. शेतकऱ्यांकडून कडधान्यांची खरेदी झाल्यानंतर पुढील टप्प्यांमध्ये दर वाढत असल्याने या वाढीचा मोठा लाभ व्यापारी आणि साठेबाजांना होत असल्याची चर्चा आहे.
शेतकऱ्याला कमी, ग्राहकाला जास्त दर
उत्पादन खर्चात सातत्याने वाढ होत असतानाही शेतकऱ्यांना कडधान्यांना अपेक्षित मोबदला मिळत नसल्याची स्थिती आहे. दुसरीकडे, बाजारात याच मालासाठी ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागत आहेत. त्यामुळे उत्पादक आणि ग्राहक या दोन्ही घटकांवर महागाईचा परिणाम होत असून, मध्यस्थांना अधिक फायदा होत असल्याची नाराजी व्यक्त केली जात आहे.
सणाच्या तोंडावर घरखर्चाचे गणित बिघडण्याची शक्यता
दसरा-दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कडधान्यांची मागणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे (Consumers Hit by Inflation) किरकोळ बाजारातील दर आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. साठेबाजीला आळा घालण्यासाठी बाजारातील प्रत्यक्ष साठ्याची तपासणी करावी, तसेच शेतकऱ्यांना योग्य दर आणि ग्राहकांना वाजवी भाव मिळण्यासाठी सरकारने आवश्यक हस्तक्षेप करावा, अशी मागणी होत आहे. सणासुदीच्या काळात महागाईचा अतिरिक्त भार सर्वसामान्यांच्या खिशावर पडू नये आणि शेतकऱ्यांनाही त्यांच्या उत्पादनाला योग्य मोबदला मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.