भारतात ‘इंस्टाग्राम प्लस’ लॉन्च; 299 रुपयांत मिळणार खास फीचर्स

By : टेक डेस्क
भारतात ‘इंस्टाग्राम प्लस’ लॉन्च; 299 रुपयांत मिळणार खास फीचर्स

सोशल मीडिया क्षेत्रातील आघाडीची कंपनी � ने भारतातील वापरकर्त्यांसाठी नवीन सशुल्क सबस्क्रिप्शन सेवा ‘इंस्टाग्राम प्लस’ लॉन्च केली आहे. दरमहा 299 रुपये शुल्क असलेल्या या प्लॅनद्वारे वापरकर्त्यांना अनेक प्रीमियम आणि प्रगत फीचर्सचा लाभ मिळणार आहे. स्टोरीजवर अधिक नियंत्रण, गुप्तपणे स्टोरी पाहण्याची सुविधा, विशेष फॉन्ट्स, अतिरिक्त प्रोफाइल कस्टमायझेशन आणि वाढीव पिन पोस्ट मर्यादा यांसारखी वैशिष्ट्ये या योजनेत समाविष्ट आहेत.

कंपनीच्या म्हणण्यानुसार, इंस्टाग्रामची मोफत आवृत्ती पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार आहे. मात्र, अधिक प्रगत फीचर्स वापरण्याची इच्छा असलेल्या वापरकर्त्यांना ‘इंस्टाग्राम प्लस’चे सदस्यत्व घ्यावे लागेल.

स्टोरीजसाठी खास फीचर्स

इंस्टाग्राम प्लसमधील सर्वात चर्चेतील फीचर म्हणजे ‘सिक्रेट स्टोरी प्रिव्ह्यू’. या सुविधेमुळे वापरकर्ते इतरांची स्टोरी पाहू शकतील, मात्र त्यांचे नाव व्ह्यूअर लिस्टमध्ये दिसणार नाही. याशिवाय, स्वतःची स्टोरी किती जणांनी पुन्हा पाहिली आहे, याची माहितीही सदस्यांना मिळणार आहे.

स्टोरीचा कालावधी 24 तासांवरून 48 तासांपर्यंत वाढवण्यात आला असून, आठवड्यातून एकदा स्टोरीला अतिरिक्त प्रसिद्धी मिळवून देणारे ‘स्टोरी स्पॉटलाइट’ फीचरही देण्यात आले आहे. तसेच स्टोरी पाहणाऱ्यांच्या यादीत विशिष्ट व्यक्तीचे नाव शोधण्याची सुविधाही उपलब्ध असेल.

कस्टम ऑडियन्स आणि विशेष डिझाइन

‘क्लोज फ्रेंड्स’ यादीप्रमाणे वापरकर्ते आता अमर्यादित कस्टम ऑडियन्स लिस्ट्स तयार करू शकतील. यामुळे वेगवेगळ्या गटांसाठी वेगळ्या स्टोरीज शेअर करणे अधिक सोपे होणार आहे.

याशिवाय, सदस्यांना खास अॅनिमेटेड सुपर हार्ट रिअॅक्शन्स, विशेष बायो फॉन्ट्स आणि कस्टम ॲप आयकॉन्सचा लाभ मिळणार आहे. यामुळे प्रोफाइल अधिक आकर्षक आणि वैयक्तिक पद्धतीने सादर करता येईल.

आता 6 पोस्ट पिन करता येणार

इंस्टाग्राम प्लसमधील आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ‘प्रोफाइल पिन्स’. या सुविधेअंतर्गत वापरकर्ते त्यांच्या प्रोफाइलवर एकावेळी 6 पोस्ट पिन करू शकतील. सध्या मोफत आवृत्तीमध्ये केवळ 3 पोस्ट पिन करण्याची मर्यादा आहे.

महसूल वाढीसाठी मेटाचा नवा प्रयोग

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील जाहिरातींवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी मेटाने ही नवीन सशुल्क योजना सादर केली आहे. या माध्यमातून कंपनीला उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत उपलब्ध होतील. कंपनीने संकेत दिले आहेत की, आगामी काळात प्लस सदस्यांसाठी आणखी काही विशेष फीचर्स सादर केले जाणार आहेत.

संबंधित सामग्री

Instagram चे मोठे अपडेट! आता कॅरोसेल पोस्टमधील प्रत्येक फोटोला देता येणार स्वतंत्र कॅप्शन

Instagram चे मोठे अपडेट! आता कॅरोसेल पोस्टमधील प्रत्येक फोटोला देता येणार स्वतंत्र कॅप्शन

Instagram ने आपल्या प्लॅटफॉर्मवर कंटेंट तयार करणाऱ्या क्रिएटर्स आणि इन्फ्लुएन्सर्ससाठी एक महत्त्वाचे अपडेट जाहीर केले आहे.

Jun 21, 2026