Hingoli Zilla Parishad: हिंगोली जिल्ह्यातील पाणीटंचाईच्या महत्त्वाच्या बैठकीत गैरहजर राहिलेल्या 3 ग्रामसेवकांना मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी तत्काळ निलंबित
हिंगोली (Hingoli Zilla Parishad) : जिल्ह्यात पाण्याचा प्रश्न पेटलेला असताना प्रशासनाच्या बैठकीलाच दांडी मारणं तीन ग्रामसेवकांना चांगलंच भोवलं. मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी बुधवारी तत्काळ कारवाई करत एल. एम. केंद्रे, डी. आर. राठोड आणि आर. एस. नागरगोजे या तिघांना निलंबित केलं.
मंगळवार, 28 एप्रिल रोजी हिंगोली पंचायत समितीत पाणीटंचाई आणि घरकुल योजनेचा आढावा घेण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी गायकवाड यांनी तातडीची बैठक बोलावली होती. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी केशव गड्डापोड, गटविकास अधिकारी माया वानखेडे यांच्यासह सर्व ग्रामसेवकांना हजर राहण्याचे आदेश होते. गावनिहाय पाण्याची स्थिती, पर्यायी उपाययोजना आणि घरकुलांच्या रखडलेल्या कामांवर चर्चा होणार होती.
मात्र, बैठकीत केंद्रे, राठोड आणि नागरगोजे पूर्णपणे गैरहजर राहिले. तर आणखी तीन ग्रामसेवक एक तास उशिरा पोहोचले. पाणीटंचाईसारख्या संवेदनशील विषयावर दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत गायकवाड यांनी गैरहजर तिघांना तडकाफडकी निलंबित केलं. उशिरा येणाऱ्या तिघांची एक वेतनवाढही रोखण्याचे आदेश काढले. या थेट कारवाईमुळे ग्रामसेवक संघटनेत एकच खळबळ उडाली आहे. जिल्ह्यात पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना प्रशासनाने ‘कामात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही’ असा स्पष्ट संदेश दिला आहे.
ॲक्शन मोड’मध्ये जिल्हा परिषद
हिंगोली जिल्हा परिषद (Hingoli Zilla Parishad) आता ‘अॅक्शन मोड’मध्ये आली आहे. पाणीटंचाई आणि घरकुलांच्या संथ कामावरून मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी कठोर भूमिका घेतली. बैठकीला गैरहजर राहणाऱ्या तीन ग्रामसेवकांचे निलंबन तर उशिरा येणाऱ्यांना आर्थिक दणका देण्यात आला. गायकवाड स्वतः पंचायत समिती स्तरावर जाऊन आढावा घेत आहेत. मंगळवारच्या बैठकीत त्यांनी गावनिहाय पाण्याचा हिशेब मागितला आणि घरकुलांच्या अडचणी सोडवण्याच्या सूचनाही दिल्या. अशा महत्त्वाच्या बैठकीला दांडी मारल्याने प्रशासनाने नाराजी व्यक्त करत थेट कारवाईचा बडगा उगारला.