अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी होर्मुजच्या समुद्रधुनीत युद्धनौका तैनात करण्याचे आवाहन केले, परंतु भारताने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.
नवी दिल्ली :
पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर होर्मुजच्या समुद्रधुनीत विविध देशांनी युद्धनौका तैनात कराव्यात, असे आवाहन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे. या पार्श्वभूमीवर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने आपली भूमिका स्पष्ट करत भारताने याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नसल्याचे सांगितले आहे.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, होर्मुज समुद्रमार्गावर युद्धनौका तैनात करण्याबाबत भारत आणि अमेरिकेदरम्यान कोणतीही द्विपक्षीय चर्चा झालेली नाही. या विषयावर विविध देशांमध्ये चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. मात्र भारताने अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही. भारत या प्रकरणात सर्व संबंधित देशांशी संवाद कायम ठेवत परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.
दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी फ्रान्स, जपान, चीन, दक्षिण कोरिया आणि ब्रिटन यांसारख्या देशांना होर्मुजच्या समुद्रधुनीच्या सुरक्षेसाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे. तथापि, अद्याप कोणत्याही देशाने अधिकृतरीत्या युद्धनौका तैनात करण्याबाबत निर्णय जाहीर केलेला नाही.
पश्चिम आशियातील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीमुळे भारत सरकारने इराणमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठीही पावले उचलली आहेत. इराणमध्ये असलेल्या भारतीयांना आर्मेनियाच्या सीमेकडे जाण्याचे आवाहन करण्यात आले असून, तेथून त्यांना सुरक्षितपणे भारतात परत आणण्यासाठी आवश्यक व्यवस्था करण्यात येत असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.